लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आ. अनिल गोटे यांच्या किसान ट्रस्टकडून अतिक्रमण झाल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत या संदर्भात कारवाई करून त्याचा अहवाल चार आठवडय़ांत सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तर २०११ मध्येच संबंधित अतिक्रमण काढण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आ. गोटे यांनी दिली आहे.
ट्रस्टने शिवतीर्थालगतच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार एका याचिकेद्वारे माजी नगरसेवक संजय वाल्हे यांनी न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने वरील आदेश दिले. वाल्हे यांनी याचिकेतून मांडलेल्या तक्रारीनुसार ट्रस्टने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी साक्री रस्त्यावर जागेची मागणी केली होती. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल १३ अटी-शर्तीनुसार तरतुदीचा आधार घेत आरोग्य विभागाकडील जमीन सरकारी पडितात दाखल करून पुतळा उभारण्यासाठी तसेच शहर सौंदर्यीकरणाचा भाग म्हणून किसान ट्रस्टच्या स्वाधीन केली होती. ट्रस्टने मात्र या क्षेत्रालगत असलेल्या तब्बल २२०० चौरस मीटर क्षेत्रावर अनधिकृतपणे बांधकाम केल्याचे शासकीय चौकशीत निष्पन्न झाले होते. शासनाने दिलेल्या जमिनीपेक्षा जवळपास दुप्पट जमीन गोटे यांच्या किसान ट्रस्टने बळकावली. तेथे लोकसंग्राम पक्षाचे कार्यालय, वाहनतळ, वृक्ष लागवड, संरक्षक जाळी उभारल्याचे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न झाला.
ट्रस्टच्या अतिक्रमणासंदर्भात कार्यवाही करून चार आठवडय़ांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने धुळे जिल्हा प्रशासनाला दिले. आ. गोटे यांनी मात्र खंडपीठाने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आदेशाची प्रत आपणास मिळालेली नाही. परंतु संबंधित अतिक्रमण २०११ मध्येच काढून टाकल्याचे सांगितले. वाहने उभी करण्यात येणारे शेड अतिक्रमित असल्याची ओरड झाली होती. आता ती शेड नसल्याने अतिक्रमणाचा प्रश्नच येत नाही, असे गोटे यांनी स्पष्ट केले आहे.