थर्टीफस्र्ट सेलिब्रेशन म्हणजे नेहमीच्या मद्याच्या पाटर्य़ा..आणि दुसरा दिवस अर्थात नववर्षांत मद्याला सोडचिठ्ठी देण्याचा संकल्प. पण थर्टीफर्स्टच्या रात्री रिचवलेले मद्य सोडण्यासाठी सकाळी उतारा घ्यावा लागतो आणि नववर्ष संकल्पावर पाणी सोडावे लागते. यंदाही थर्टीफर्स्ट पाटर्य़ामध्ये मांसाहारी पदार्थावर ताव मारत मद्य रिचविण्यात अनेकजण रमले होते आणि नववर्षांत मद्याला हात लावणार नाही, असा संकल्प सोडत होते. मात्र दुसरीकडे अट्टल दारुडय़ांची मात्र शाळा भरली होती आणि तिथे त्यांची दारू सोडण्यासाठी धडपड सुरू होती. प्रत्येक दारुडा आपल्या आयुष्याची दारूमुळे कशी वाताहत झाली, याचे कथन करत होता. यातूनच ‘पुढच्याला ठेच मागचा शहाणा..’ या उक्तीप्रमाणे प्रत्येकाला जीवनाची नवी दिशा मिळत होती.
सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनचे बेत आखले जातात. थर्टीफस्र्ट सेलिब्रेशन म्हणजे नेहमीच्या ओल्या पाटर्य़ा..चटकदार मांसाहारी पदार्थ, वेगवेगळ्या प्रकारचे मद्य, डिजेच्या तालावर नाचगाणी, असे साधारणत: स्वरूप असते. आठवडाभर आधीच थर्टीफस्र्ट पार्टी कशी आणि कुठे करायची, असे बेत आखले जातात. हॉटेल्स, रिसॉर्ट, बार, फार्म हाऊस बुकिंगचे वेध लागतात. दोन दिवस आधीच नववर्षांच्या पाटर्य़ा रंगू लागतात. यंदाही शहरात असेच काहीसे चित्र होते. पुढच्या वर्षांत मद्य पिणारच नाही, असे अनेकजण संकल्प सोडत होते आणि मद्याची अखेरची पार्टी म्हणून मनसोक्त मद्य रिचवीत होते. मात्र, थर्टीफर्स्टच्या पूर्वसंध्येला ठाण्यात भरलेल्या अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस ठाणे आंतर समूहाच्या वर्गात वेगळे चित्र होते. एके काळी ज्यांचे दारूशिवाय पानही हालत नव्हते, ज्यांच्यासाठी रोजचा दिवसच ३१ डिसेंबर होता, ते या वर्षांत दारूला स्पर्शही न करण्याचा संकल्प अधिक दृढ करीत होते. तसेच तळीराम प्रवृत्तीचा वीट आलेल्या नव्या सभासदांना मार्गदर्शन करीत होते. जेमतेम २२ ते ६० वयोगटातील सुमारे २५ ते ३० अट्टल दारुडे या सभेला उपस्थित होते. या वर्गात कुणी शिक्षक नव्हते. इथे कुणी भोंदुबाबा किंवा अंगारा-धुपारा आणि औषधे वगैरे नव्हते. प्रत्येक दारुडा आपले आत्मकथन करीत होता आणि इतर दारुडे ते शांतपणे मन लावून ऐकण्यात दंग होते. दारूमुळे काय गमावले आणि आयुष्याची कशी वाताहत झाली, याचे प्रत्येक दारुडा सविस्तर कथन करीत होता. त्याच्या अनुभवातून प्रत्येक जण आत्मचिंतन करत होता आणि त्यातून दारूपासून दूर राहण्याची प्रेरणा घेत होता. एकीकडे समाज दारुडा म्हणून हिणवत असताना दुसरीकडे वर्गात मात्र प्रत्येक जण कुटुंबातील सदस्यांप्रमाणे एकमेकांच्या भावना आणि दु:ख समजून घेत होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने जगण्याचा नवा मार्ग प्रत्येकाला मिळत होता.