महापौरांची गाडी सुसाट सुटलीय.. सभागृह नेतेही खूश आहेत.. स्थायी समितीचे तर बघायलाच नको. राहता राहिले विरोधी पक्षनेते. त्यांच्या चेहऱ्यावरील ‘तेज’ही वाढतेच आहे. सगळीकडे असे आलबेल चित्र दिसत असताना सत्तेत असूनही आपली मात्र झोळी रिकामीच, या त्राग्याने ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या बहुतांश नगरसेवकांना ग्रासले असून मंगळवारी आपल्याच नेत्यावर धावून जाताना पक्षातील याच धुसफुशीचे दर्शन पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेवकाने घडविल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे हे चित्र काही एकटय़ा शिवसेनेत नाही. ठाणे महापालिकेतील ‘गोल्डन गँग’ म्हणून नेहमीच चर्चेत असलेल्या ठरावीक सर्वपक्षीय नगरसेवकांच्या एका गटाविरोधात सर्वच पक्षांतील नगरसेवक अक्षरक्ष: खदखदू लागले असून या ‘गँग’ला नेतेमंडळींकडूनच वरदहस्त लाभत असल्याने इतर नगरसेवक ‘बिच्चारे’ ठरू लागले आहेत.
ठाण्याचे महापौर म्हणून हरिश्चंद्र पाटील यांना गेल्या दोन वर्षांत फारसे काही प्रभावी करता आलेले नाही. पक्षातील नगरसेवकांचा एक मोठा गट त्यांच्या कार्यपद्धतीविषयी उघड नाराजी व्यक्त करताना दिसतो. जिल्हासंपर्क नेते एकनाथ िशदे यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या महापौरांविषयी नाराजी तरी कुठे व्यक्त करायची, असा प्रश्न इतर नगरसेवकांना पडला आहे. ठाणे महापालिकेत स्थायी समितीची नियुक्ती होते, मात्र इतर समित्यांच्या नियुक्त्या करताना सर्वच पक्षांतील प्रमुख नेते कुरबुर करतात यामुळे सर्वच पक्षांतील मोठय़ा गटात नाराजी आहे.
सत्तेचे केंद्र आपल्याच भोवती फिरत राहावे यासाठी विकेंद्रीकरणास या नेत्यांची तयारी नसल्याचे इतरांचे म्हणणे आहे. या वादातूनच वागळे इस्टेट भागातील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय मोरे यांनी सभागृह नेते नरेश म्हस्के यांना मंगळवारी ‘आवाज’ दिल्याचे बोलले जाते.
नाराजी सर्वच पक्षांत
ठाण्यातील राजकीय पटलावर सर्वपक्षीय स्पर्धा सुरू असल्याचे चित्र एकीकडे रंगविले जात असले तरी महापालिकेतील ‘अर्थपूर्ण’ कामांमध्ये अनेकदा सर्वपक्षीय सहमती झाल्याचे पाहावयास मिळते. बाहेरून पाहणाऱ्यांना िशदे-आव्हाडांसारखे नेते एकमेकांचे कट्टर वैरी भासत असले तरी येथील राजकीय वर्तुळातील ‘आतले’ चित्र मात्र अनेकदा वेगळेच असते.
महापालिकेबाहेरील काही नेते आणि आतमधील ठरावीक नगरसेवकांची ‘गोल्डन गँग’ असे सर्वपक्षीय सहमतीचे राजकारण येथे वर्षांनुवर्षे सुरू आहे. एकमेव नगरसेवक असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुधाकर चव्हाण यांच्या गळ्यात सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन सभापतीपदाची माळ घातली, तेथे या मांडवलीच्या राजकारणाची पुन्हा प्रचीती आली. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनाही चव्हाणांचा ‘दिलदार’पणा भावतो आणि त्यामुळेच या निवडीला कुणीही हरकत घेतली नाही.
मांडवली करण्यात माहीर असलेल्या ठरावीक नेत्यांचे चांगभलं होत असताना आपण यामध्ये कुठेच नाही, अशी भावना सर्व पक्षांतील नगरसेवकांमध्ये निर्माण झाली असून त्यातून ही धुसफूस टोक गाठू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. महापालिकेतील ‘गोल्डन गँग’च्या पलीकडे जाऊन माहितीच्या अधिकारात माहीर असलेल्या काही नगरसेवकांनी स्वत:ची वेगळी ‘दुकाने’ थाटल्याने अशांचे सगळे ‘व्यवस्थित’ सुरू आहे. इतरांची मात्र ‘बिच्चाऱ्यां’मध्ये विभागणी होऊ लागल्याचे चित्र आहे.