शेंडेचिंच (ता. माळशिरस) येथे सोमवारी सकाळी दोन चिमुरडय़ांसह आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचा हुंडय़ासाठी सासरी छळ होत असल्याची तक्रार आल्यावरून मयताच्या पती व सासू – सासऱ्याविरुद्ध आज गुन्हा दाखल झाला असून वेळापूर पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
याबाबत वेळापूर पोलिसांकडून माहिती मिळाली, की मयत रेश्मा व औदुंबर क्षीरसागर यांचा विवाह सन २००९ साली झाला होता. त्यांना गौरी (वय ३) व गणेश दीड वर्षे अशी दोन अपत्येही होती. मात्र लग्नापासूनच मयत रेश्मा हिचा हुंडय़ाचे पैसे दिले नाहीत, स्वयंपाक येत नाही आदी कारणांविरुद्ध मानसिक व शारीरिक छळ होत होता. त्यास कंटाळून मयत रेश्माने दोन अपत्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार मयत रेश्माचे वडील नारायण रंदवे रा. निगडी पुणे यांनी केल्यावरून वेळापूर पोलिसांनी रेश्माचे पती औदुंबर,सासू शामल व सासरे कृष्णा क्षीरसागर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून औदुंबर याला अटक केली असून माळशिरसचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्यास २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सहा. पो. नि. शिवशंकर बोंदर पुढील तपास करीत आहेत.