बरोबर ५० वर्षांपूर्वीची गोष्ट. अगदी तारखेने २७ जानेवारी १९६३. स्थळ- दिल्ली येथील नॅशनल स्टेडियम. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय फिल्म उद्योगातर्फे  आयोजित भव्य संगीत संध्येमध्ये बरेच दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची उपस्थिती या खास कार्यक्रमात होती. जवळजवळ सर्वच महान संगीतकार, गायक  देशभक्तीच्या आपापल्या नवीन रचना सादर करत होते. त्या गाण्यांमध्ये अर्थात आनंदाची, उत्सवाची भावना प्रकर्षांने होती. त्यामुळे वातावरण उत्साही झालं होतं. एकएक संगीतकार आपली रचना सदर करत होता.
थोडय़ाच वेळात संगीतकार सी. रामचंद्र व गायिका लता मंगेशकर स्टेजवर आले. भलामोठा वादकांचा, विशेषत: ढोल-ताशे यांच्या ग्रुपने गजर  करत वातावरण धुंद करून टाकलं.
सुरुवातीच्या त्या मोठ्या आवाजी तुकड्यानंतर एकदम वाद्यांचा आवाज थांबला.. आणि लता  मंगेशकर यांच्या आर्त स्वरातील ‘‘ए मेरे वतन के लोगो.. तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका लहेरालो तिरंगा प्यारा..’’ या पंक्ती उमटल्या आणि वातावरण भारून गेले व सर्वांचे कान अधिकच टवकारले गेले. पुढील ओळींनी मात्र सर्वाना अक्षरश: स्तब्ध केलं. पर मत भुलो सीमापर वीरो ने हैं प्राण गवाये. कुछ याद उन्हें भी करलो.. जो लौटके घर ना आये..”
पूर्ण गाणं झाल्यावर काही क्षण शांतता आणि नंतर टाळ्यांचा कडकडाट.. पं. नेहरूंच्या डोळ्यात तर अश्रू तरळत होतेच; पण अनेक उपस्थित अक्षरश: रडत होते.  
या महान गीताचे कवी प्रदीप यांनी काही वर्षांपूर्वी आमच्या भेटीत सांगितलेली ही आठवण.
 कवी प्रदीप यांचे अत्यंत प्रभावी शब्द, सी. रामचंद्र यांची तितकीच समर्पक संगीत रचना  आणि या दोन्हीमधील भाव अत्यंत पूरकपणे रसिकांपर्यंत पोहोचवणारा  लताजींचा अद्वितीय स्वर.. या गाण्याने इतिहास घडवला.
या गाण्याची प्रसिद्धी इतकी झाली त्याची अजून एक आठवण कवी प्रदीप यांनी सांगितली होती. ते एकदा प्रवासासाठी चुकून रेल्वेच्या मिलिटरी डब्यात शिरले. डबा खचाखच भरलेला होता.  त्यामुळे तेथील जवानांनी प्रदीप यांना खाली उतरायला सांगितलं.  पण तोपर्यंत रेल्वे धावू लागली होती.  म्हणून प्रदीप यांनी पुढील स्टेशन येईपर्यंत निदान खाली बसून प्रवास करण्यासाठी विनंती केली.  ते बसले आणि त्यांच्याशी गप्पा मारताना  ‘ए मेरे वतन के  लोगो.’  या गीताचे गीतकार स्वत: आपल्याबरोबर प्रवास करतायत हे जवानांना समजलं आणि मग काय.. जवानांनी त्यांच्यासाठी सीटवर जागा करून अत्यंत आदराने बसवलं आणि त्यांची माफीदेखील मागितली.  जवान म्हणाले, “आतापर्यंत देशभक्ती किंवा समरगीते वगैरे अनेक  आली आणि गाजली देखील. पण पूर्ण भारतीय सेनेचा उल्लेख मात्र केवळ तुमच्याच या गीतात आहे. त्याबद्दल खरंच आम्ही तुम्हाला सलाम करतो.. गाण्याचा शेवट हा “जयहिंद जयहिंद. जय हिंद की सेना.. जयहिंद..’ या शब्दांनी होतो आणि खरंच त्याची परिणामकारता अधिकच तीव्र होते.
स्वत: लता मंगेशकर यांनी एकदा म्हटल्याप्रमाणे या गाण्याचे शब्दच इतके  मार्मिक  आहेत की गाणं नुसतं वाचलं तरी कोणीही वाचणारा भावुक झाल्याशिवाय राहणार नाही”.
या गाण्याची विशेष रेकॉर्ड देखील काढण्यात आली.  गाण्याच्या निर्मितीमधील कवी, संगीतकार, गायक, वादक, तंत्रज्ञ आदी कोणीही मानधन न घेता  रेकॉर्डिंग झालं.  त्या रेकॉर्डवर छापण्यात आलं होतं ,की रेकॉर्ड विक्रीतून मिळालेलं उत्पन्न हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात येईल.  
आता या वर्षी हे गीत आपली अर्ध-शताब्दी पूर्ण करतंय. काळाच्या ओघात अनेक  गोष्टी   नष्ट होतात किंवा त्याचं महत्त्व कमी होऊ शकतं.  मात्र आज तब्बल ५० वर्षांनंतरदेखील  ‘ए मेरे वतन के लोगो.’  ची परिणामकारकता आणि ताजेपणा यत्किंचितही  कमी झालेला नाही.
हे गाणं ऐकून जो प्रभावित होणार नाही, तो हिंदुस्थानीच नाही..’ पं. नेहरूंनी आपल्या मुंबईमधील भाषणात केलेलं हे अतिशय चपखल वर्णन आहे.
 ए मेरे वतन के लोगो.  गाण्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त त्या शूर जवानांप्रमाणेच सर्व भारतीयांचा देखील ही अमर निर्मिती करणाऱ्या सर्वाना सलाम..!!

south east central railway recruitment 2024 Job opportunities in south east central railway
नोकरीची संधी : ‘दक्षिण पूर्व मध्य रेल्वे’मधील संधी
UPSC 2023 Topper Aditya Srivastava
अडीच लाख महिना पगार सोडून UPSC ची तयारी केली आणि थेट देशात पहिला आला; आदित्य श्रीवास्तवचा अविश्वसनीय प्रवास!
Bharti Hexacom initial share sale from 3rd April
भारती हेक्साकॉमची ३ एप्रिलपासून प्रारंभिक समभाग विक्री
mumbai passengers marathi news, local train marathi news
सुट्टीकालीन लोकल वेळापत्रकाने प्रवासी हैराण, गुड फ्रायडेच्या दिवशी लोकलचा खोळंबा