सध्या भारतात सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लिगमध्ये राजस्थान रॉयलचे तीन खेळाडू स्पॉट फिक्सिंगमध्ये सापडल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने या तीन खेळाडूंचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे अध्यक्ष संदीप देसाई यांनी केली आहे.     
पत्रकात म्हटले आहे की, भारतीय क्रिकेटचा बाजार करून तरूणांना वेड लावलेले इंडियन प्रीमिअर लिग (आयपीएल) पहिल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात होते. कारण मोठय़ा प्रमाणात होणारा खेळ हा आता ‘इंडियन प्रिमीअर लिग’ नसून ‘इंडियन जुगार लिग’ वाटत आहे. देसाई पुढे म्हणाले की, स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असलेल्या सर्व खेळाडूंवर कडक कारवाई करावी, आयपीएलच्या प्रत्येक सामन्यावर पोलीस प्रशासनाने लक्ष ठेवावे, जे खेळाडू स्पॉट फिक्सिंगमध्ये सापडलेले आहेत त्यांच्यावर आजीवन बंदी घालावी,आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या सर्व संघांच्या मालकीची व खेळाडूंची चौकशी करण्यात यावी,आदी मागण्याही त्यांनी पत्रकात केल्या आहेत.या वेळी दिग्विजय पाटील, अमृत लोहार, प्रशांत जरग, रोहित केसरकर, उत्तम बामणे, अमोल बुचडे,पारस पालिचा आदी उपस्थित होते.