ठाणे जनता सहकारी बॅंक या अग्रगण्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर रवींद्र कर्वे यांनी गेल्या पाच वर्षांत पत्करलेल्या अनोख्या समन्वयी सेतूच्या भूमिकेमुळे गरजवंत आणि दात्यांचा अचूक मेळ साधला जात तब्बल अडीच कोटींचा निधी सामाजिक कार्यासाठी उपलब्ध झाला आहे. ‘विश्वास वाढविणारी कृतिशील समाजसेवा’ असे या बहुपेढी सामाजिक उपक्रमाचे नाव आहे. गेल्या रविवारी ठाण्यात या कर्वेप्रणीत दाते, लाभार्थी संस्था तसेच विद्यार्थी-पालकांचा स्नेहमेळावा झाला. त्यात आता एका चळवळीचे स्वरूप प्राप्त झालेल्या या उपक्रमाचा पाच वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेऊन पुढील वाटचालीची दिशा ठरविण्यात आली. निवृत्तीनंतर कर्वे स्वत: मुंबईतील नाना पालकर स्मृती समिती रुग्णालयात दररोज तीन तास मानद सेवा देत आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी विविध सामाजिक तसेच शैक्षणिक प्रकल्पांना दात्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे.

*  दुर्गम भागात अद्ययावत शाळा
या कृतिशील समाजसेवेतून रायगडमधील तळे-माणगांव परिसरातील दुर्गम भागात तीन माध्यमिक शाळा कार्यान्वित होऊन तेथील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे शिक्षण उपलब्ध झाले. या शाळांमध्ये दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी सायकलीही देण्यात आल्या आहेत. तळा तालुक्यातील उत्तरखुर्द, माणगाव तालुक्यातील वडघर मुद्रे तसेच रातवड येथील या शाळांमध्ये स्वतंत्र संगणक कक्षात इ-लर्निग सुविधाही उपलब्ध आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील जव्हार तालुक्यात डेंगाची भेट येथील छत्रपती शिक्षण संस्थेच्या विनाअनुदानित शाळेचे माध्यान्ह भोजन निधीअभावी बंद होते. कर्वेच्या नेटवर्कमधून या शाळेतील ४५० विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनासाठी दरमहा १ लाख १० हजार रुपयांचा निधी देणारा दाता मिळाला.  

* दिल्या-घेतल्याचा चोख ताळेबंद  
या कृतिशील समाजसेवेत प्रत्येक दात्याला त्याने दिलेल्या निधीचा चोख हिशेब देण्याचे पथ्य रवींद्र कर्वे यांनी कसोशीने पाळले आहे. ते कुणालाही ‘अमुक इतकी मदत करा’ असे सांगत नाहीत. कामाचे स्वरूप पाहून दात्यांनीच यथाशक्ती मदत द्यावी, असा त्यांचा आग्रह असतो. या उपक्रमातून वर्षभरात कोणत्या संस्थांना निधी मिळाला,त्यातून कोणते प्रकल्प पूर्ण झाले आता आणखी कोणत्या प्रकल्पांना किती मदतीची आवश्यकता आहे,याचा संक्षिप्त ताळेबंद असणारी एक पुस्तिका रवींद्र कर्वे प्रसिद्ध करतात. यंदाच्या पुस्तिकेत रायगडमधील तिन्ही शाळांचे प्रकल्प पूर्ण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे परिसरातील इतर संस्थांना आता नेमकी किती गरज आहे, याचाही तपशील देण्यात आलेला आहे. उदा. भिवंडी तालुक्यातील पडघे येथील छत्रपती शिक्षण संस्थेच्या शाळेच्या नव्या इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले असून त्यासाठी ६० लाख रुपये हवे आहेत. मुंबईतील नाना पालकर स्मृती समितीच्या रुग्ण सेवा सदनासाठी मार्च-२०१४ पर्यंत आठ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.   

* गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
गेल्या काही वर्षांपासून विविध संस्थांना मदत करण्याबरोबरच गुणवंत असूनही केवळ गरिबीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे धोरणही या कृतिशील समाजसेवेने अवलंबले आहे. या उपक्रमातून आतापर्यंत ४७ विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी २१ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. दहावीत नव्वद टक्क्य़ांहून अधिक गुण मिळविणाऱ्या पण परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेण्यास असमर्थ ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी या योजनेतून शंभर टक्के शिष्यवृत्ती दिली जाते.