मध्य रेल्वेमार्गावर गेला आठवडाभर सातत्याने सुरू असलेल्या अपघातांच्या मालिकेने रविवारी कळस केला आणि १८ जणांचा बळी घेतला. मध्य रेल्वेवर होणाऱ्या या अपघातांची तात्कालिक कारणे काहीही असली, तरी देखभाल-दुरुस्ती व सुरक्षा विभागांतील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, अपुरे आणि तेही दुय्यम दर्जाचे साहित्य यांमुळेच मध्य रेल्वेमार्गावर वारंवार अपघात होत असल्याचा आरोप होत आहे. ‘लोकसत्ता’ने गेल्या तीन महिन्यांत सातत्याने या प्रश्नांकडे लक्ष वेधले होते. मात्र रेल्वे प्रशासनाने या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या आठवडय़ात मध्य रेल्वेमार्गावर छोटे-मोठे अनेक अपघात झाले. ट्रान्स हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायरचा खांब वाकणे, एकाच दिवशी तीन गाडय़ांना आग लागणे, दुरांतो एक्स्प्रेसने एका ट्रकला उडवणे अशा अनेक घटना या आठवडय़ात घडल्या. मात्र रविवारी दिवा-सावंतवाडी गाडीचे डबे घसरले आणि या अपघातांचा कळस गाठला गेला. प्रत्यक्षदर्शीच्या मते दोन रुळांमधील वेल्डिंग तुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मध्य रेल्वेवर देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षा या दोन विभागांत हजारो पदे रिक्त आहेत. एकटय़ा मुंबई विभागात गँगमनची ४०० पदे अद्याप भरलेली नाहीत. त्यामुळे सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण पडतो. त्यातच अपुरे साहित्य असल्याने एका गाडीतील साहित्य दुसऱ्या गाडीला बसवण्याचे प्रकारही चालतात. त्यातच उन्हाळी मोसमात जादा गाडय़ा चालवल्या जातात. त्याचा ताणही अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर असतो. परिणामी एका गाडीच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाच ते सहा तास घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठ तासांत दोन गाडय़ा मार्गी लावाव्या लागतात. कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आणि दुय्यम दर्जाचे साहित्य प्रवाशांच्या जिवावर उठण्याची शक्यता याआधीही वर्तवण्यात आली होती. मात्र रेल्वेने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.
अपघाताला रेल्वे मंत्रालयच जबाबदार!
रेल्वे मंत्रालयाने रिक्त पदांचा विचार करून ती तातडीने भरणे आवश्यक होते. मात्र अर्जविनंत्या करूनही ही पदे अद्याप रिक्तच आहेत. रविवारी झालेल्या अपघातामागे रुळांमधील वेल्डिंग तुटणे, हे कारण असल्यास त्याला दुय्यम दर्जाचे साहित्य कारणीभूत आहे. मध्य रेल्वेमध्ये हजारो कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. तसेच वापरण्यात येणारे साहित्यही दुय्यम दर्जाचे असून त्या साहित्याचीही वानवा आहे. मात्र मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अथवा विभागीय व्यवस्थापक यांच्यावर ठपका ठेवण्याऐवजी रेल्वे मंत्रालयावर ठपका ठेवावा लागेल. या अपघाताच्या निमित्ताने लहान कर्मचाऱ्यांचा बळी न देता या सर्वाना जबाबदार असलेल्यांची पाळेमुळे रेल्वेने खणून काढावीत. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रयत्न करावेत.
वेणू नायर, महामंत्री (नॅशनल रेल्वे मजदूर युनियन)