टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिरामागे सुमारे चार ते पाच हजार आधारकार्ड उकिरडय़ावर फेकून देण्यात आल्याचे मंगळवारी सकाळी उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. भिवंडी परिसरातील नागरिकांची ही ओळखपत्रे असल्याची आधार कार्डवरील पत्त्यावरून स्पष्ट होत आहे. तहसीलदार व पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
शासनाकडून काढण्यात येणारी आधारकार्ड टपाल खात्यातर्फे रजिस्ट्रर पोस्टाने नागरिकांना घरपोच पाठवली जातात. भिवंडी तालुक्यातील नागरिकांची आधारकार्डे एवढय़ा मोठय़ा संख्येने टिटवाळ्यात कुणी  आणून टाकली, याविषयी अनेक तर्क लढवले जात आहेत. माजी नगरसेवक सुरेश भोईर मंदिराजवळून जात असताना त्यांना एका उकिरडय़ावर पावसात एका विशिष्ट रंगाचे कागद भिजत असल्याचे आढळून आले. त्यांनी जवळून पाहिले असता ती आधारकार्डे असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तहसीलदार किरण सुरवसे यांना याबाबत सांगितले. तसेच टिटवाळा पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर ही सर्व आधारकार्डे ताब्यात घेऊन याप्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना घरपोच आधारकार्डे पोहचवण्याची जबाबदारी टपाल विभागाची आहे. त्यामुळे त्यांच्याकडे याबाबत विचारणा करण्यात आली आहे, असे तहसीलदार किरण सुरवसे यांनी सांगितले.