डॉ. रामप्रकाश आहुजा व गजाननराव बापट हे अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे, कर्मठ, पारदर्शी असे होते. ते दोघाही अजातशत्रू होते. दोघांनीही मानवीय संबंध आपल्या कार्यकुशलतेने कायम ठेवले होते, अशा शब्दात मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात दिवं. रामप्रकाश आहुजा आणि गजाननराव बापट यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नेते बनवारीलाल पुरोहित यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.या श्रद्धांजली सभेला भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक डॉ. दिलीप गुप्ता, भाजपाचे नेते संजय जोशी, प्रदेश सरचिटणीस आमदार देवेंद्र फडणवीस, महापौर अनिल सोले, आमदार कृष्णा खोपडे आदी उपस्थित होते.
डॉ रामप्रकाश आहुजा सज्जन, पारदर्शी आदर्श स्वयंसेवक होते पक्षाचे अध्यक्ष असताना महामंत्री म्हणून त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली, अशी आठवण नितीन गडकरी यांनी सांगितली. रामप्रकाश आहुजा आणि गजाननराव बापट यांनी कधीही कोणतेही पद मागितले नाही. उलट प्रतिकूल परिस्थितीत पक्ष वाढविला. त्याचप्रमाणे गजाननराव बापट हेदेखील सत्कार, सत्ता, सन्मान, प्रसिद्धी या पासून सतत दूर राहिले. घरातच त्यांनी कार्यालय चालविले. हे दोघेही नेते असले तरी त्यांची खरी ओळख कार्यकर्ताच म्हणून होती, अशा शब्दात गडकरींनी दोन्ही नेत्यांचा गौरव केला.