News Flash

अजितदादांवर नाराज असलेले आझम पानसरे राष्ट्रवादीपासून अलिप्त!

राष्ट्रवादी काँग्रेसचे िपपरी-चिंचवड शहरातील ताकदीचे नेते आझम पानसरे यांनी हळूहळू पक्षापासून चार हात लांब राहण्याची भूमिका घेतली असून राष्ट्रवादीच्या बैठका, मेळावे अथवा अन्य कार्यक्रमांना ते

| January 15, 2013 02:39 am

राष्ट्रवादी काँग्रेसचे िपपरी-चिंचवड शहरातील ताकदीचे नेते आझम पानसरे यांनी हळूहळू पक्षापासून चार हात लांब राहण्याची भूमिका घेतली असून राष्ट्रवादीच्या बैठका, मेळावे अथवा अन्य कार्यक्रमांना ते गैरहजर राहात असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी जवळीक असलेल्या पानसरे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बेबनाव असल्याचे मानले जाते. नाराज पानसरेंच्या अलिप्त धोरणामुळे त्यांचे समर्थक सैरभैर झाले आहेत.
मागील २५ वर्षांपासून शहराच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या आझम पानसरे यांनी िपपरी पालिकेतील सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष व महापौरपद भूषवले. राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्यांनी विधानसभा व लोकसभा निवडणूक लढवली. पक्षाचे सलग दोन वेळा शहराध्यक्षपद सांभाळले. शरद पवार यांच्याशी थेट संपर्क असलेल्या पानसरेंचे अलीकडे अजितदादांशी जमत नाही. शनिवारी अजितदादा चिंचवडला होते. मात्र, शहरात असूनही पानसरे तिकडे फिरकले नाहीत. त्यांना बैठकीचे निमंत्रण नव्हते, असे कारण सांगितले जाते. त्याच सायंकाळी चिखली कृष्णानगरमध्ये एका कार्यक्रमात ते सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत हजर होते. राष्ट्रवादीच्या ग्राहक मेळाव्यासाठी ‘साहेब’ आले होते. तेव्हा ‘साहेब, तुमची माया पातळ करू नका, िपपरी-चिंचवडकडे लक्ष राहू द्या’ असे सूचक विधान पानसरे यांनी केले होते.
दोन वर्षांपूर्वी तानाजी खाडेंना स्थायी समिती अध्यक्षपद नाकारल्यानंतर पानसरेंनी अजितदादांच्या विरोधात उघड बंड केले. नऊ महिने ते पक्षात असून नसल्यासारखे वागत होते. त्यांच्या अघोषित बहिष्काराने पक्षाचे काम थंडावले होते. तेव्हा जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून प्रवेशाची त्यांना ‘ऑफर’ आली होती. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा काँग्रेस प्रवेशही नक्की झाला होता. मात्र, नाटय़मय घडामोडींनंतर पानसरेंचे ‘साहेबांशी’ थेट संभाषण झाले व त्यांनी ‘यू-टर्न’ घेतला. पवार काका-पुतण्याशी थेट पंगा घेण्याचे धाडस त्यांनी दाखवले नाही. दुसरीकडे, समर्थकांच्या रेटय़ामुळे पानसरेंच्या नाराजीची दखल पवारांना घ्यावी लागली व राष्ट्रवादीकडील उपलब्ध कोटय़ातून ग्राहक कल्याण संरक्षण समितीचे अध्यक्षपद दिले. पानसरेंना लाल दिवा मिळाला. मात्र, स्थानिक राजकारणात हे पद उपयोगाचे नसल्याचे त्यांच्या लवकरच लक्षात आले. महापालिका निवडणुकीत त्यांच्या समर्थकांची तिकिटे कापली गेली, पदे देताना त्यांच्या शिफारशी डावलल्या. विश्वासात न घेताच महत्त्वाचे निर्णय होतात. राष्ट्रवादीच्या शहर कार्यकारिणीत पानसरे समर्थकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अशा कारणांमुळे अस्वस्थ असलेल्या पानसरे यांनी सध्या वेगळी वाट धरली आहे की ते तिरकी चाल खेळत आहेत, याविषयी तर्कवितर्क आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 2:39 am

Web Title: aajam pansare stays far from ncp wich upset on ajit pawar
टॅग : Ncp
Next Stories
1 बंटी जहागिरदारवरील कारवाई २ महिन्यांपासून प्रलंबित
2 आणखी ३४ शिक्षकांना अटक व कोठडी
3 अधिक पाणी लागणाऱ्या उद्योगांवर बंधने घालावी
Just Now!
X