राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ठसा उमटवणारी मराठी चित्रपटसृष्टी तिकीट गल्ल्यावर मार खाते, हा समज खोटा पाडण्याचा चंग यंदा मराठी चित्रपटांनी बांधलेला दिसतो. गेल्या तीन महिन्यांत प्रदर्शित झालेल्या आणि दर्जाच्या बाबतीतही वरचढ असलेल्या तीन चित्रपटांनी चांगलाच गल्ला जमवला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आजचा दिवस माझा’ने तीन दिवसांतच ५२ लाखांची कमाई केली आहे. त्याशिवाय ‘बीपी’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटांनी कोटीची उड्डाणे गाठली आहेत.
गेल्या वर्षी ‘काकस्पर्श’ आणि ‘तुकाराम’ या चित्रपटांनी उत्तम गल्ला जमवला होता. त्याखालोखाल ‘शाळा’, ‘भारतीय’, ‘आयना का बायना’ यांनीही चांगली कामगिरी केली. मात्र यापैकी बहुतांश चित्रपट वर्षांच्या उत्तरार्धात आले होते. यंदा मात्र पहिल्या महिन्यापासूनच मराठी चित्रपटांनी व्यावयायिक यश मिळवण्यास सुरुवात केली आहे.
जानेवारीत आलेल्या ‘बालक-पालक’ने सशक्त विषय, उत्तम हाताळणी आणि योग्य प्रसिद्धी या त्रिसूत्रीच्या जोरावर दणक्यात सुरुवात केली. काही दिवसांतच या चित्रपटाने एक कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यानंतरही ‘बीपी’ने जोरदार घोडदौड केली. सध्या या चित्रपटाने साडेनऊ कोटी रुपयांवर कमाई केली आहे. तर, ‘प्रेमाची गोष्ट’ या हलक्याफुलक्या तरीही आशयघन चित्रपटानेही उत्तम सुरुवात करत चांगली कमाई केली. नुकतेच या चित्रपटाचे ५० दिवस पूर्ण झाले असून अडीच कोटींच्या वर कमाई केली आहे.
चंद्रकात कुलकर्णी यांनी ‘तुकाराम’च्या यशानंतर हाती घेतलेला ‘आजचा दिवस माझा’ चारच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत केवळ १०० पडद्यांवर ५२ लाख रुपयांची कमाई केली. सोमवारीही पुण्यातील काही चित्रपटगृहांमध्ये हिंदी चित्रपटांच्या तुलनेत या चित्रपटाला चांगला प्रतिसाद होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पहिल्या तीन महिन्यांत प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांनी उत्तम गल्ला जमवल्याने पुढील चित्रपटांसाठी हा शुभसंकेत ठरत आहे.