आम आदमी पार्टीची कराड दक्षिण व कराड शहर कार्यकारिणी जाहीर झाली असून, सभासद नोंदणीसाठी मेळावे घेणे, सर्व सामान्यांना प्रशासकीय कामात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तक्रार निवारण केंद्र सुरू करणे व पक्षाच्या ध्येय धोरणानुसार कार्यरत राहणार असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकारी व कराड दक्षिणचे संयोजक अॅड. संदीप चव्हाण व कराड शहरचे संयोजक डॉ. मधुकर माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आम आदमी पार्टी पूर्णत: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आदर्श माणून कार्यरत राहणार आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी राजकीय सत्तास्थानाशिवाय न्याय नाही, अशी भूमिका अॅड. चव्हाण यांनी मांडली. यावर माहितीचा अधिकार, जनलोकपाल व दप्तर दिरंगाईचा कायदा अमलात आणण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर दबदबा राखणाऱ्या महाराष्ट्रातीलच अण्णा हजारेंना व त्यांच्या आदर्श विचारप्रणालीला डावलून केजरीवालांची पार्टी महाराष्ट्रात उभारी येईल का? या प्रश्नावर नवनिर्वाचित पदाधिकारी गोंधळून गेले. अण्णा हजारे निश्चितच महान सामाजिक कार्यकर्ते आहेत. परंतु, आम्ही त्यांच्या विचारांचा सन्मान करीत असताना, केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या ध्येय धोरणानुसारच केजरीवाल यांचेच नेतृत्व जाहीरपणे मान्य करून  सामान्यातील सामान्य, उपेक्षित आणि भ्रष्टाचाराने तसेच, अन्यायाने पीडित असलेल्या जनतेला न्याय मिळवून देण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही अॅड. संदीप चव्हाण यांनी दिली. अॅड. व्ही. के. पाटील यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आक्रमक लढा देण्यात ‘आप’ची टीम कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली. पत्रकार बैठकीला कराड दक्षिण व कराड शहर कार्यकारिणीचे बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते.