आम आदमी पार्टी महापालिकेच्या निवडणुकीत सर्व जागा लढवणार आहे. उमेदवार देताना ज्यांच्यावर एकही गुन्हा दाखल झालेला नाही, अशी स्वच्छ प्रतिमा असलेल्यांनाच तिकिटे दिली जातील. दहशतीच्या जोरावर एकाही प्रभागातील निवडणूक बिनविरोध होणार नाही, याकडे लक्ष ठेवून, अशा ठिकाणी उमेदवारी दाखल करेल, असे पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य राजू आघाव यांनी आज पत्रकारांना सांगितले.
या वेळी पक्षाचे संघटक किरण उपकारे, अमित मन्यार, प्रसाद सैंदाणे आदी उपस्थित होते. नगरची निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने राज्य कार्यकारिणीकडे परवानगी मागितली आहे. एक-दोन दिवसांत परवानगी मिळेल, अशी अपेक्षा आघाव यांनी व्यक्त केली. पक्षाकडे ७ ते ८ जणांनी उमेदवारी मागितली आहे, काही जणांनी पाठिंबा मागितला आहे. राजकारण हे घाणेरडे आहे, असे म्हणून जे घरात बसतात, त्यांनी पक्षात सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाने केले आहे. त्यास काही जणांनी प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती आघाव यांनी दिली.
पक्षाचे जिल्हय़ात आतापर्यंत साडेतीन हजार तर नगर शहरात साडेचारशे प्राथमिक सदस्य झाले आहेत. निवडणुकीसंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व त्यांच्या नगर शहरातील कार्यकर्त्यांशी पक्ष संपर्क साधणार आहे. नगरच्या मनपामध्ये घराणेशाही, गुंडशाही व भ्रष्टाचा-यांचा कारभार होता, आम आदमी पक्ष सत्ताधीश होण्यासाठी नाही तर लोकांच्या हातात सत्ता देण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचा दावा त्यांनी केला.