‘आम्ही दुर्गा’ या लघु चित्रफितीचे प्रदर्शन रामलीला मैदानावर दिग्दर्शक सोमू शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. या लघु चित्रफितीत स्मिता दाभाडे यांनी प्रमुख भूमिका केली आहे.  
यामध्ये स्त्रीभ्रूण हत्येविषयीच्या जनजागृतीसाठी स्मिता दाभाडे यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. यापूर्वीच्या लघुपटात स्मिता दाभाडे यांनी महिलांची छेडछाड, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना धाक बसावा, या हेतूने ‘नारायणी’ची भूमिका केली. त्याच धर्तीवर ‘आम्ही दुर्गा’मध्ये श्रीमती दाभाडे यांनी डॉक्टरची भूमिका बजावली आहे. या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे, उपविभागीय अधिकारी रवींद्र पवार, सुनील लांजेवार, आरती मार्डीकर, रमेशचंद्र बगडिया आदी उपस्थित होते.
शनिवारी रामलीला मैदानावरील कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्मिता दाभाडे यांच्या भूमिकेचे कौतूक केले. नारायणी, आम्ही दुर्गा या लघु चित्रफितींमधून महिलांवरील अन्याय, अत्याचाराचा विषय सक्षमपणे मांडला आहे. पोलिसांनी तंटामुक्तीच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्या थांबावी यासाठी काम केल्याने मुलींचा जन्मदर ८३८ वरून ९५० वर गेला असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी सांगितले.