काळाच्या ओघात हद्दपार होत चाललेल्या गांधी टोपीला आम आदमी पक्षामुळे पुन्हा चांगले दिवस आले आहेत. विदर्भात आम आदमी पक्षाकडे कार्यकर्त्यांचा वाढता ओघ बघता टोपीची मागणी वाढली आहे. त्यांनी पांढऱ्या रंगाच्या लाखो टोप्यांची मागणी विक्रेत्यांकडे नोंदविली आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढय़ात गांधी टोपीला फारच महत्त्व होते. अगदी अलीकडे प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील मुले व शिक्षकही गांधी टोपी परिधान करीत होते. गांधी टोपी घालणे म्हणजे सुसंस्कृत व चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे लक्षण मानले जात असे. स्वातंत्र्योत्तर काळातही अनेक वर्षे गांधी टोपीचा प्रभाव होता. खादीपासून बनवली जात असल्यामुळे तिला खादी टोपीही म्हटले जाते. बदलत्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या कापडापासून टोप्या बनवल्या जाऊ लागल्या. टेरिकोट, नायलॉन व कॉटन आदीचा त्यात समावेश आहे. चंदू टोपी, मिनिस्टर टोपी, उंच दिवाल, लहान दिवाल व अहिराऊ आदी टोप्याचे विविध प्रकार बाजारात विक्रीस होते. लहानांपासून थोरांपर्यत सर्वजण टोपीचा वापर करीत होते. काळानुरूप फॅशनचे युग आले आणि या गांधी टोप्यांचा वापरही कमी झाला. ग्रामीण भागात वयोवृध्दांच्या डोक्यावर दिसणारी टोपी गेल्या काही दिवसात  लग्नसराईतही क्वचितच दिसत असे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे आणि त्यानंतर आम आदमी पक्षामुळे टोपीचा वापर वाढला असून आता अनेकांच्या डोक्यावर पुन्हा गांधी टोपी दिसू लागली आहे.
विशेषत: दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर या पक्षाकडे कार्यकर्त्यांचा ओघ वाढत आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातही मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते या पक्षाशी जुळत असताना प्रत्येकाचे स्वागत ही टोपी घालून केले जात आहे. पक्षामध्ये पदाधिकाऱ्यांपासून सामान्य कार्यकत्यार्ंच्या डोक्यावर टोपी असली की हा आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. पक्षामध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांला टोपी घालणे आवश्यक केल्यामुळे टोप्यांची मागणी वाढली आहे. आम आदमी पक्षाने एका कंत्राटदाराला लाखो टोप्या तयार करण्याचे कंत्राट दिल्याची माहिती आहे. येणाऱ्या दिवसात लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका असल्यामुळे प्रत्येक मतदारांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी आपचे सदस्य टोप्यांचे वाटप करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘मै हू आम आदमी’ असे लिहिण्यात आलेली टोपी ही पक्षाची अधिकृत टोपी समजली जाते. एखाद्या पांढऱ्या टोपीवर काही लिहिले नाही तर तो आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता नसल्याचे समजले जाते. आम आदमी पक्ष स्थापन होण्यापूर्वी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात टोप्यांची जणू फॅशन आली होती. जो तो टोपी घालून अण्णांच्या आंदोलनात सहभागी होत असे. मधल्या काळात प्रमाण कमी झाले असले तरी आता आम आदमी पक्षामुळे ते पुन्हा वाढल्यामुळे येणाऱ्या काळात ही टोपी राज्यात आणि केंद्रात काय बदल घडविते हे येणारा काळच ठरवेल.