आम आदमी पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षातील विदर्भातील कार्यकर्ते सामान्य नागरिकांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरले आहे. विविध भागातील झोपडपट्टीतील लोकांच्या समस्या ऐकून घेत त्यांच्याकडून सदस्यात्वाचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. शिवाय विविध कामगार संघटनांची आंदोलने हायजॅक करून कामगारांना आम आदमी पक्षाकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
विकल्या गेले सर्व.. आता तरी जागा व्हा.. नेत्यांसाठी नाही तर ‘आप’ ल्यासाठी जागा आणि घरातून बाहेर पडा, असा प्रचार करीत आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते शहरातील विविध भागातील झोपडपट्टीमध्ये आणि कामगारांच्या धरणे आंदोलनात किंवा निदर्शनात ‘आप’ची पारंपरिक टोपी घालून सहभागी होत आहेत. शहरातील पक्षाच्या कार्यकत्यार्ंनी आता महापालिकेला लक्ष्य केले असून एसएनडीएल आणि ओसीडब्ल्यू (ऑरेज सिटी वॉटर वर्क्‍स) हटावच्या घोषणा देणे सुरू केले आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न जाणून घेत त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊन त्यांना ‘आप’मध्ये सहभागी व्हा, असे आवाहन केले जात आहे. रिझव्‍‌र्ह बँक चौकात आम आदमी पक्षाच्या कार्यकत्यार्ंनी वीज पाणी आणि इतर समस्या घेऊन महापालिकेच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असल्यामुळे स्थानिक समस्या घेऊन भाजपला लक्ष्य करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांंनी सुरू केला आहे. त्यासाठी काही सामाजिक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आम आदमी पक्षाने हाताशी धरले आहे. शहरात सामाजिक क्षेत्रात किंवा चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांनी ‘आप’ने सदस्यत्व स्वीकारले असल्यामुळे चळवळीत काम करणारे अनेक नेते लवकरच आम आदमी पक्षाचा प्रचार करताना दिसतील.
आम आदमी पक्षाची स्थापना करण्यात आल्यानंतर काही समाजसेवक अण्णा हजारे समर्थकांनी स्वतला दूर ठेवत राजकीय पक्ष स्थापन करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यासोबत न जाण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीमध्ये मिळालेल्या यशानंतर आणि २०१४ मध्ये लोकसभा आणि त्यानंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका समोर ठेवून चळवळीत सहभागी झालेल्या विदर्भातील अनेक कार्यकर्त्यांंना आम आदमी पक्षाशी जोडले जात असून त्यांच्याशी संपर्क करीत बैठका आयोजित केल्या जात आहेत. भ्रष्टाचारमुक्त आणि व्यवस्था परिवर्तनासाठी लढणारा आम आदमी पक्ष सक्रिय झाला आहे.
त्यांनी विदर्भात लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जनमत तयार करतानाच उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी चळवळीत किंवा प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या अनेक ज्येष्ठ समाजसेवकांशी आणि अधिकाऱ्यांशी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते संपर्कात असून त्यांना पक्षात येण्यासाठी आग्रह केला जात असल्याची माहिती पक्षाच्या एका कार्यकर्त्यांने दिली. ज्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, मात्र समाजात प्रतिष्ठित असे नाव आहे त्यांची लवकरच बैठक आयोजित केली जाणार असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नागपुरात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.