प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर रिंगणात उतरल्याने प्रचाराची रणधुमाळी उडाली असताना या कोलाहलात रिंगणातून बाहेर राहिलेला बहुचर्चित आम आदमी पक्ष अंतर्धान पावल्याचे अधोरेखित झाले आहे. लोकसभा निवडणुकीत अनामत रक्कम गमाविण्याची नामुष्की ओढावल्यानंतर ‘आप’ला अशी काही गळती लागली, की आधी हजारोंच्या संख्येने नोंदणी करणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची संख्या आज जेमतेम २०वर आली आहे. सर्व पक्ष सध्या आक्रमक प्रचारात गुंतले आहेत. दुसरीकडे आप मात्र ‘नोटा’ (यापैकी कोणीच नाही) या पर्यायाचा वापर करावा म्हणून मतदारांची जनजागृती करत आहे.
सारे काही ‘सर्वसामान्य’ या बिरुदाखाली एकत्र आलेल्या काही उत्साही मंडळींनी दोन वर्षांपूर्वी आम आदमी पक्षाची स्थापना केली होती. दिल्लीतील यशानंतर आपच्या लाटेवर स्वार होत लोकसभा निवडणुकीत काही दिग्गज मंडळींसह सर्वसामान्य नागरिकही मैदानात उतरले. मात्र लोकसभा निवडणुकीत राज्यात एकही जागा न मिळाल्याने पक्षात आहोटीचे सत्र सुरू झाले. सध्या तर केवळ काही कार्यकर्त्यांमुळे नाशिकमध्ये पक्षाचे नाममात्र अस्तित्व शिल्लक आहे. विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली. आपचा उमेदवार नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी मतदाराला मिळालेल्या ‘नोटा’ म्हणजे यापैकी कोणीही नाही, या पर्यायाचा प्रचार व प्रसार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जेव्हा आप प्रसिद्धीच्या झोतात होता, तेव्हा अनेक मंडळी या पक्षात दाखल होत होती. त्यावेळी पक्षाची प्रतिमा पाहत एकटय़ा नाशिकमध्ये पक्षाकडे २७ हजाराहून अधिक जणांनी पक्ष सदस्य म्हणून नोंदणी केली. त्यातील ३५० कार्यकर्ते लोकसभा निवडणूक काळात सक्रिय राहिले. प्रचार, प्रसार आणि अन्य कामांत १५० कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता. पण विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना पक्षाचा डोलारा केवळ २० कार्यकर्त्यांवर उभा आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सध्या वातावरण ढवळून निघाले आहे. यात ‘आप’ मात्र या प्रक्रि येपासून बाहेर राहिला. वरिष्ठ पातळीवरून, ज्या व्यक्ती पद किंवा अन्य काही इच्छेने पक्षात सामील झाले आहेत. त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी विधानसभा निवडणुकीत पक्षाने सक्रिय न होण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे राज्यात कोठेही आपने उमेदवार उभा केलेला नसल्याचे जिल्हा समन्वयक जितेंद्र भावे यांनी सांगितले. आपची जिल्हा तसेच शहर कार्यकारिणी सध्या मतदान करताना मतदार राजाला मिळालेल्या ‘नोटा’चा प्रसार आणि प्रचार करत आहे. सामान्य प्रश्नांची जाण असलेला एक राजकीय पक्ष, नेता तसेच कार्यकर्ता सध्या राज्यात नाही. याची जाणीव करत ‘नोटा’द्वारे राजकीय पक्षांना नाकारण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी वैयक्तिक भेटीगाठी, बैठकांवर भर दिला जात आहे. दुसरीकडे ‘मिशन विस्तारीकरण’च्या माध्यमातून पक्ष संघटना बांधणीवर भर देण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रभाकर वायचळे यांनी सांगितले.