आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे ‘गडकरी-मुत्तेमवार यांची मिहानमधील रिटॉक्स कंपनीत भागीदारी आहे’ असे बोललेच नाहीत, असे घूमजाव ‘आप’ने केले आहे.
अरविंद केजरीवाल यांची गेल्या आठवडय़ात कस्तुरचंद पार्कवर जाहीर सभा झाली. त्या सभेत केजरीवाल यांनी मिहानमधील रिटॉक्स कंपनीत खासदार विलास मुत्तेमवार व भाजपचे नितीन गडकरी यांची भागीदारी असल्याचा आरोप केला होता. आरोप सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान मुत्तेमवार व गडकरी यांनी दिले होते. या पाश्र्वभूमीवर आम आदमी पक्षाने आज पत्रकार परिषद घेतली.
‘गडकरी-मुत्तेमवार यांची मिहानमधील रिटॉक्स कंपनीत भागिदारी आहे’ असे केजरीवाल बोललेच नाहीत. ‘काही लोक मला येऊन भेटले आणि त्यांनी सांगितले की मिहानमधील रिटॉक्स कंपनीत गडकरी-मुत्तेमवार यांची भागिदारी आहे’ असे केजरीवाल म्हणाले होते, त्यांनी आरोप केला नाही, असे पक्षाचे रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रताप गोस्वामी म्हणाले. केजरीवाल यांच्या भाषणाची ध्वनिफित ऐकविण्याची त्यांनी तयारी दर्शविली. मिहानचे गुणगान करणारे गडकरी-मुत्तेमवार या प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबद्दल बोलत का नाहीत, मिहान व रिटॉक्स कंपनीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या, त्यानंतर त्या डिनोटिफाईड केल्या गेल्या, मिहान प्रकल्प अपयशी ठरला हे मान्य नाही का, मिहानसाठी गडकरी व मुत्तेमवार यांनी मार्केटिंग केले आहे म्हणूनच या गैरप्रकारात त्यांचा सहभाग नाही का, असे प्रतिप्रश्न गोस्वामी व ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी केले. मिहानसाठी एल अँड टी कंपनीने सादर केलेला अहवाल व आकडेवारी खोटी ठरली असून नव्याने अहवाल करावा, नव्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना चौपट रक्कम द्या, अन्यथा त्यांची रक्कम परत करा, अशी मागणी गोस्वामी यांनी केली.