दिल्लीतील सत्तांतरामुळे चर्चेत आलेल्या आम आदमी पार्टी अर्थात, ‘आप’ ची तिकीट मिळावी म्हणून विदर्भातील दहा लोकसभा क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांनी मुंबईत मुलाखत कार्यक्रमासाठी गर्दी केली आहे. आज पहिल्याच दिवशी चंद्रपूर, नागपूर, अमरावती, यवतमाळ लोकसभेसाठी मुलाखती झाल्या. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेसाठी शेतकरी संघटना व आप युतीने अॅड. वामनराव चटप यांचे नाव जाहीर केले असतांना सुध्दा चंद्रपुरातील इच्छुकांनी मुलाखती दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दिल्लीत आम आदमी पक्षाने सत्ता प्राप्त केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आपची घौडदौड सुरू असतांना लोकसभा निवडणूक लक्षात घेता इतरही राज्यात आपने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आपने यापूर्वीच देशभरातील ३०० लोकसभा मतदार संघात निवडणुका लढविण्याचे जाहीर केले आहे. त्याचाच एक राज्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे सत्र सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपच्या मुंबईतील अंधेरीच्या कार्यालयात विदर्भातील १० लोकसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत कार्यक्रमाला आजपासून सुरुवात झालेली आहे. आपचे राज्यातील प्रभारी मयांक गांधी व अंजली दमानिया यांच्या नेतृत्वाखाली या मुलाखतीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच टप्प्यात चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रासाठी जवळपास दहा इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यात इको प्रो या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते बंडू धोतरे, अॅड. राजेश विराणी, जयप्रकाश मिश्रा, चौधरी व अन्य काही इच्छुकांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, आपच्या मुंबईतील नेत्यांनी काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेसोबत चंद्रपूर व नांदेड लोकसभा मतदार संघात युती झाल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार चंद्रपूर लोकसभेसाठी अॅड.वामनराव चटप व नांदेडसाठी गुणवंत पाटील हंगर्णेकर यांची नावेही जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता अचानक आपच्या वतीने चंद्रपूर क्षेत्रासाठी मुलाखती घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आजच्या मुलाखत सत्रात आपच्या तीन नेत्यांनी इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली. त्यात उमेदवारांच्या शिक्षणापासून तर आर्थिक उत्पन्न, विविध सामाजिक क्षेत्रात आजवर केलेला अनुभव, तसेच यापूर्वी कोणत्या पक्षाचे पदाधिकारी किंवा सदस्य होते काय, याची सुध्दा माहिती घेण्यात आली. प्रत्येक उमेदवाराना जवळपास १५ ते २० मिनिट मुलाखत घेऊन देशाची सध्याची राजकीय परिस्थिती, तसेच त्याचे राजकीय ज्ञान याची सुध्दा चाचपणी करण्यात आली. चंद्रपूर क्षेत्रासोबतच आज विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, गोंदिया, चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी सुध्दा मुलाखती घेण्यात आल्या. लोकसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी आपची तिकीट मिळावी म्हणून विदर्भातील जवळपास दोनशे इच्छुकांनी आपच्या कार्यालयात गर्दी केली होती.
विशेष म्हणजे आपच्या वतीने महिनाभरापूर्वीच लोकसभा लढण्यास इच्छुक असलेल्यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेतले होते. ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेले होते त्यांना व अन्य काही उमेदवारांना सुध्दा आपने मुलाखतीसाठी रितसर निमंत्रण दिले होते. त्यामुळेच आम्ही सर्व जण मुंबईला आलो असल्याची माहिती एका इच्छुक उमेदवाराने लोकसत्ताशी बोलतांना दिली.
आपच्या वतीने मुलाखतींचा कार्यक्रम राबविला जात असला तरी विदर्भातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींकडून स्थानिक पातळीवर कुणाला उमेदवारी दिली पाहिजे याची सुध्दा चाचपणी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया या नागपूरला येऊन गेल्या होत्या, अशीही माहिती सूत्रांनी दिली                      आहे.
दुसरीकडे, विश्वासात न घेता आपने चंद्रपूर, नांदेडसह अन्य काही ठिकाणच्या परस्पर मुलाखती घेतल्याने शेतकरी संघटनेचे नेते दुखावले आहेत.