राज्यात नुकत्याच पार पडलेल्या युवक कॉंग्रेस विधानसभा समिती, लोकसभा समिती व प्रदेश समितीच्या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. आर्णीचे उपनगराध्यक्ष व कांॅग्रेसचे गटनेते आरीज बेग प्रदेश युवक कॉंग्रेस कार्यकारिणीच्या सरचिटणीसपदी निवडून आले. विशेषत: विदर्भ व मराठवाडय़ातून २७०० मते घेऊन आरीज बेग चौथ्या क्रमांकावर निवडून आले.
 कोणताही राजकीय वारसा नसतांना आरीज बेग यांनी खासदार रजनीताई पाटील यांचे पुत्र आदित्य पाटील, आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर, माजी मंत्री अजहर हुसेन यांचे पुत्र झिशान हुसेन, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांचे पुत्र बाळासाहेब रेंगे, माजी आमदार सिराज देशमुख यांचे पुत्र फरीद देशमुख यांच्यासह राज्यातील मोठय़ा कांॅग्रेस नेत्याद्वारा समर्थित उमेदवारांना मागे टाकून बाजी मारली. याशिवाय चंद्रपूर, आर्णी लोकसभा युवक कांॅग्रेस समितीच्या सरचिटणीसपदी अमोल मांगुळकर व अवी पाटील चालबर्डीकर हे निवडून आले. सभासद नोंदणी व बुथनिहाय निवडणुकीत आधीपासूनच आघाडीवर असलेल्या आर्णी विधानसभा मतदार संघाला अपेक्षित यश मिळाले. शिवाजीराव मोघे व युवकांचे नेते आमदार अमित देशमुख यांचा आपल्याला या निवडणुकीत पाठिंबा होता. उमरखेड तसेच चंद्रपूर लोकसभेतील राजुरा व वरोरा या विधानसभेतून चांगला प्रतिसाद मिळाला, असे आरीज बेग यांनी आवर्जुन सांगितले.
आर्णी विधानसभा अध्यक्षपदी श्रीनिवास नालमवार, उपाध्यक्षपदी नितेश बुटले, तर सरचिटणीसपदी दिग्विजय शिंदे, अतुल देशमुख, दिनेश कुनघाटकर, शोएब काजी, कुणाल भगत, नितेश जाधव, अनिता मुद्दलवार व अनिता गेडाम हे निवडून आले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी निवडीचे श्रेय शिवाजीराव मोघे, युवा नेते जितेंद्र मोघे व मतदार संघातील कॉंग्रेस नेते पदाधिकारी व युवक कॉंग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांना दिले.