श्रीमंत नायिका, एका गरीब माणसाच्या प्रेमात पडते. प्रेमात पडून त्याच्याशी लग्नही करते. आणि लग्न झाल्यानंतर मात्र हीच नायिका नवऱ्याकडून घटस्फोट मागते. अशावेळी, त्या नवऱ्याचे काय हाल होतात?.. अशा पध्दतीची कथा असेलेले अनेक चित्रपट अभिनेता गोविंदा याने हिंदीत केले होते. मात्र, असाच गोविंदासाठी म्हणून हिंदीत ठरवलेला चित्रपट आता मराठीत येतो आहे. शालीन आर्ट्सची निर्मिती असलेल्या ‘आता माझी हटली’ या चित्रपटात अभिनेता भरत जाधव मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक महेंद्र देवळेकर यांनी सांगितले की त्यांनी काही वर्षांपूर्वी गोविंदाला या चित्रपटाची कथा ऐकवली होती. त्याने होकारही दिला होता मात्र काही कारणांमुळे चित्रपट होऊ शकला नाही. पण, चित्रपटाची कथा आजही लोकांना आवडेल अशी आहे. मुळात, वरवर विनोदी वाटला तरी त्यात रहस्य आहे. त्यामुळे, मराठीत या चित्रपटाला कोण न्याय देऊ शकेल, असा विचार करताना एकच नाव होतं ते म्हणजे भरज जाधव. भरतलाही कथा आवडली आणि त्याने लगेच होकार दिल्यामुळे ‘आता माझी हटली’ या चित्रपटाची तयारी सुरू झाल्याचे देवळेकर यांनी सांगितले. देवळेकर यांनी वीस वर्ष अनिल शर्मा, सुनील अग्निहोत्री अशा हिंदीतील चित्रपट दिग्दर्शकांक डे सहाय्यक म्हणून काम केले होते. स्वतंत्रपणे दिग्दर्शनाचा हा त्यांचा पहिलाच अनुभव आहे तर निर्माते शालीन सिंग यांनीही याआधी हिंदीतील अनेक मालिकांमध्ये काम केले असून त्यांचा चित्रपटनिर्मितीचा हा पहिलाच प्रयत्न आहे. भरतबरोबर यात रूचिता जाधव नायिकेच्या भूमिकेत असून तिचाही हा पहिलाच चित्रपट आहे. गोविंदाबरोबर चित्रपट करायचे राहून गेले असले तरी ‘आता माझी हटली’ या चित्रपटाच्या कथानकाला हिंदीतूनही ऑफर येत असल्याचे देवळेकर यांनी सांगितले.