बेकायदा वाळू वाहतूक करणारी मालमोटार पकडून चालकाला कारवाईसाठी ताब्यात घेऊन कारवाईसाठी पोलीस ठाण्याकडे नेत असताना वाटेत ती मालमोटार अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याचा प्रकार दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते शमशापूर रस्त्यावर घडला. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून वाळू तस्करीविरुद्ध व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा धसका वाळूमाफियांनी घेतला आहे. या मोहिमेचा भाग म्हणून विजापूर रस्त्यावर हत्तूर ते शमशापूर वाळू वाहतूक करणारी मालमोटार (एमएच १२ एक्यू ५०३१) तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या पथकाने पकडली. मालमोटारचालक बलभीम हिप्पा वाघमारे (रा. सोरेगाव, सोलापूर) यास मालमोटारीसह विजापूर नाका पोलीस ठाण्याकडे कारवाईसाठी घेऊन येत असताना वाटेत सदर मालमोटार खड्डय़ात अडकली. तेव्हा मालमोटार तेथेच उभी करून चालकाला घेऊन पोलीस ठाण्याकडे येत असताना चालकाच्या अज्ञात साथीदारांनी सदर मालमोटारच तेथून पळवून नेली, याप्रकरणी बलभीम वाघमारे व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.