रा.गो.टाकळकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या वतीने येथील बुलढाणा अर्बनच्या सहकार सेतू सभागृहात अबोली गद्रे यांच्या शास्त्रीय गायनाची मैफि ल झाली. रा.गो.टाकळकर स्मृती संगीत सेवा पुरस्काराचे प्रथम मानकरी म्हणून येथील तबलावादक आनंद साबदे यांना प्रा. अभय गद्रे व अरविंद टाकळकर यांनी पुरस्कार प्रदान केला. प्रारंभी आनंद साबदे व कलाकारांनी टाकळकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले.
या वर्षीपासून एक हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप करण्यात आले आहे. शहर व परिसरातील संगीतक्षेत्रात निस्वार्थीपणे सेवा करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दरवर्षी स्मृतिदिनाला देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणानंतर अबोली गद्रे यांनी मैफि लीची सुरुवात बागेश्री रागातील ख्याल बन बन ढुंत मोहन प्यारे विलंबित रूपक तालातील स्वरांगिनी डॉ. प्रभाताई अत्रे यांनी बांधलेली बंदीश सादर केली. ‘ना डारो रंग मो पे’ या बागेश्री रागातील छोटय़ा ख्यालनंतर तान देरे ना हा तराणा रसिकांच्या मनाला भावून गेला. अबोली गद्रे यांनी सजन बीना लागे चैन हा दादरा समर्थपणे सादर केला.
‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘नरवर कृष्णा समान’ ही नाटय़गीते रसिकांची दाद घेऊन गेली. आगाशे काकांचा जोगवा दरबार आईचा, यानंतर सुरेश भटांची गझल आसवांचे जरी हसे झाले, हिंदी गझल सलोनासा सजन व भक्तीगीतांमध्ये ‘भेटी लागे जीवा लागलीसी आस, शंभो शंकरा’ ही गीते समर्थपणे सादर केली. मैफि लीची सांगता भरवी रागातील सर्वश्रृत रचना ‘श्याम सुंदर मदन मोहन, जागो मेरे लाला’ या भावुक बंदिशीने केली.
मैफि लीसाठी संवादिनीवर प्रा. अभय गद्रे यांनी, तबल्यावर शत्रुघ्न अढाऊ होते. तानपुऱ्याची साथ पुजा पाठक यांनी केली. कार्यक्रमाचे संचालन रविकिरण टाकळकर यांनी केले. मैफि लीसाठी धिरज उबरहंडे, जीवन शेगावकर, अर्जुन सातपुते, विशाल मोरे, दीपक नागरे, नितीन देशमुख, निषाद टाकळकर.स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.