पोलीस व फरारी आरोपींमधील ‘अर्थ’पूर्ण संबंध उघड झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून पोलिसांना हुलकावणी देणारा काशिनाथ पुयड शुक्रवारी कारागृह प्रशासनास शरण आला. दरम्यान, फरारी आरोपींना मदत केल्याप्रकरणी बुधवारी रात्री गुन्हा दाखल झालेल्या विठ्ठल मारोती पुयड याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.
जिल्ह्यात फरारी आरोपींची संख्या १७ आहे. शिक्षा झाल्यानंतर पॅरोलच्या रजेवर सुटलेले हे आरोपी विहित मुदतीत कारागृहात परतले नाहीत. ‘अर्थ’पूर्ण सहकार्याने खुलेआम फिरणाऱ्या फरारी आरोपींविरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली. इतवारा पोलीस ठाण्याचे सहायक अधीक्षक पंकज देशमुख व त्यांच्या पथकातील फौजदार राहुल तायडे, बंडू कलंदर, नागरगोजे, स्वामी, पद्माकर कांबळे यांनी हा शोध सुरू केला होता. मोहिमेत गजानन पुयड याला अटक केल्यानंतर पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती हाती लागली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक ढोले यांच्या नातेवाइकांनी फरारी आरोपींची लाखमोलाची जमीन कवडीमोल दरात विकत घेतली. विशेष म्हणजे ही सर्व दस्तनोंदणी ढोले यांचा विश्वासू व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागातील दहशतवादविरोधी पथकात कार्यरत असलेला कर्मचारी एकनाथ मोकले हाच साक्षीदार असल्याचे निष्पन्न झाले.
गेले १३ महिने पोलिसांना हुलकावणी देणारा व जन्मठेपेची शिक्षा झालेला काशीनाथ पुयड शुक्रवारी हजर झाला. फरारी आरोपीला मदत करणाऱ्या विठ्ठल मारोती पुयड याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. पॅरोल रजा घेताना पुणेगाव येथील जन्मठेप झालेल्या आरोपींनी दाखल केलेली वैद्यकीय प्रमाणपत्र खरी की खोटी, या बाबतचा खुलासा सहायक अधीक्षकांनी जिल्हा शल्यचिकित्सांकडे मागितला आहे. शिवाय ढोले यांच्या नातेवाइकांनी खरेदी केलेल्या प्रकरणातही स्वतंत्र अहवाल सहायक अधीक्षक पंकज देशमुख यांनी वरिष्ठांना सादर केला.
सूत्रांच्या माहितीनुसार पुणेगाव येथील जन्मठेप झालेल्या आरोपींना पॅरोल रजेवरून सुटल्यानंतर उजळ माथ्याने फिरू देण्यास स्थानिक पोलीस, तसेच ‘स्थागुशा’मधील काही कर्मचाऱ्यांची मदत होती. या प्रकरणाचा तपास देशमुख यांनी स्वतकडे ठेवला आहे. जे कोणी गरकृत्य करतील, अशांविरुद्ध निश्चितच कारवाई होईल, असे सांगून देशमुख यांनी लवकरच या प्रकरणातील आणखी काही महत्त्वाच्या बाबी उघड होतील, असे स्पष्ट केले.