इचलकरंजीतील स्वीकृत सदस्य निवडीत लाख मोलाचा मुद्दा वादग्रस्त ठरला आहे. अर्थपूर्ण व्यवहारामुळे एक क्रियाशील कार्यकर्ता अडचणीत आला आहे. याबाबतचा वाद एका मंत्र्याच्या दरबारात पोचला असून तेथे मार्ग काढण्याचे काम सुरू होते. इचलकरंजी नगरपालिकेची निवडणूक होऊन वर्ष होत आले. आता नवे शिक्षण मंडळाचे सदस्य निवडले जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एका राजकीय पक्षाकडून स्वीकृत सदस्य निवडीसाठी तीव्र चुरस सुरू होती. अखेर सुमारे महिन्याभराच्या घोळानंतर एका सदस्याची निवड करण्यावर एकमत झाले.
अर्थात या प्रक्रियेसाठी लाखमोलाचा व्यवहार करण्याची वेळ आली. प्रथम या सदस्याकडे ११ लाखाची मागणी करण्यात आली, नंतर ती १५ लाखांवर गेली. त्यामुळे हा विषय तापत चालला. अखेर तो एका मंत्र्याच्या दरबारात पोहोचला. लोकसभा निवडणुकीच्यावेळी एका व्यक्तीचे देणे असल्यामुळे ही रक्कम लागणार असल्याचे स्पष्टीकरण मंत्र्यासमोर करण्यात आले. त्यावर मंत्र्याने नाराजी व्यक्त करीत साहेबांकडून त्या वेळी चांगली रक्कम आली होती, असे सांगत तेंव्हाचा हिशोब एखाद्या कार्यकर्त्यांवर लादणे अयोग्य असल्याचे सांगितले. या विषयावरून पक्षामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली असून कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रकार सुरू आहे का, असा मुद्दा मांडला जात आहे.