बहुतांश नगरसेवक ‘मौनी बाबा’!
विद्यमान बेस्ट समितीच्या सदस्यांची वर्षभरातील कामगिरी पाहता निवडून आलेल्या नगरसेवकांपेक्षा स्वीकृत सदस्यांनीच ‘बेस्ट’च्या कामात अधिक रस घेतल्याचे दिसत आहे. समितीच्या बैठकीत तोंड उघडणाऱ्या सदस्यांची संख्याही मोजकीच आहे. प्रवासी व ग्राहकांच्या हिताचे मुद्दे मांडणाऱ्यांमध्येही स्वीकृत सदस्यच आघाडीवर आहेत.
ही बेस्ट समिती एप्रिल २०१३ मध्ये स्थापन झाली. तिच्या अध्यक्षपदी नाना आंबोले यांची निवड झाली. समितीत अध्यक्षांसह १७ सदस्य आहेत. त्यात ७ निवडून आलेले नगरसेवक, तर १० स्वीकृत सदस्य आहेत. या समितीच्या बैठका महिन्यात दोन ते तीन वेळा होतात. या बैठकांमध्ये प्रवाशांच्या आणि उपक्रमाच्या हिताच्या ठरावांची चर्चा होते. तसेच या समितीने घेतलेले निर्णय प्रशासनासाठी आदेशासमान असतात.
या समितीच्या गेल्या दहा महिन्यांच्या कारभारावर नजर टाकल्यास निर्वाचित नगरसेवकांपेक्षा स्वीकृत सदस्यांची कामगिरीच वरचढ आहे. नाना आंबोले, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, अशोक पाटील, अरविंद दुधवडकर, गीता यादव, संदीप देशपांडे आणि याकुब मेमन हे निवडून आलेले सदस्य आहेत. यांपैकी नाना आंबोले, अशोक पाटील आणि अरविंद दुधवडकर वगळता इतर सदस्यांचा सहभाग केवळ उपस्थितीपुरता आहे. त्यातही संदीप देशपांडे यांनी ३१ जानेवारीपर्यंत २६ पैकी फक्त आठच बैठकींना हजेरी लावली आहे. राहुल शेवाळेही केवळ पाच वेळाच बेस्ट समितीच्या बैठकांना उपस्थित राहिले आहेत. या पाश्र्वभूमीवर १० स्वीकृत सदस्यांची कामगिरी उजवी ठरते. सुनील गणाचार्य आणि केदार होंबाळकर यांनी वेळोवेळी अभ्यासपूर्ण मुद्दे मांडून प्रवासी, ग्राहक आणि बेस्ट प्रशासन यांच्या हिताची भूमिका घेतली आहे. त्यांच्याबरोबर रंजन चौधरी, सुहास सामंत, शिवजी सिंह, प्रमोद मांद्रेकर यांनीही अनेकदा चर्चामध्ये सहभाग घेतला आहे.
मौनी सदस्यांमध्ये नगरसेविका गीता यादव, स्वीकृत सदस्य आकाश पुरोहित, मोहम्मद गौस शेख, भास्कर खुरसंगे, श्रीनिवास त्रिपाठी यांचा क्रमांक वरचा आहे. या सदस्यांनी गेल्या २६ बैठकींमध्ये अगदी एक-दोन वेळाच कृतिशील सहभाग घेतला आहे. यांपैकी गीता यादव, श्रीनिवास त्रिपाठी, आकाश पुरोहित हे अनुक्रमे २२, २३ आणि २१ बैठकींना उपस्थितही राहिले. एप्रिल २०१३ ते जानेवारी २०१४ पर्यंतची समिती सदस्यांची उपस्थिती. या कालावधीत एकूण २६ बैठकी झाल्या.

क्र.      समिती सदस्य         उपस्थित     अनुपस्थित
१.     संजय आंबोले (अध्यक्ष)      २६      ००
२.      राहुल शेवाळे (स्थायी अध्यक्ष)      ०५      २१
३.      अशोक पाटील (नगरसेवक)     १९      ०७
४.      अरविंद दुधवडकर (नगरसेवक)      २४      ०२
५.      सुहास सामंत (स्वीकृत)         २०      ०६
६.     सुनील गणाचार्य (स्वीकृत)     २३      ०३
७.      रंजन चौधरी (स्वीकृत)          २६      ००
८.      श्रीनिवास त्रिपाठी (स्वीकृत)      २३      ०३
९.      आकाश पुरोहित (स्वीकृत)     २१      ०५
१०.     गीता यादव (नगरसेविका)     २२      ०४
११.     शिवजी सिंह (स्वीकृत)          २४      ०२
१२.     प्रमोद मांद्रेकर (स्वीकृत)      २२      ०४
१३.     मोहम्मद गौस शेख (स्वीकृत)      १६      १०
१४.     भास्कर खुरसंगे (स्वीकृत)     १८      ०८
१५.     संदीप देशपांडे (नगरसेवक)      ०८      १८
१६.     याकुब मेमन (नगरसेवक)     १६      १०
१७.     केदार होंबाळकर (स्वीकृत)      २१      ०५