सकाळी किंवा संध्याकाळी गर्दीच्या वेळी एखाद्या बसस्टॉपवर उभे असताना तुमच्या बाजूच्या एखाद्या माणसाने अचानक एखाद्या गाडीला हात केला, ती गाडी थांबली आणि तो माणूस त्या गाडीत बसून प्रवासाला रवाना झाला, तर चक्रावून जाऊ नका! ‘असेल गाडीवाला त्याच्या ओळखीचा. आपल्याला काय, शेवटी बसच्याच रांगेत उभे राहायचे आहे,’ असे विचारही मनात आणू नका! कारण सध्या मुंबईत ‘हात दाखवा, गाडी थांबवा’ हे सूत्र सरसकट सगळ्याच महत्त्वाच्या रस्त्यांवर चालू आहे. या ‘थांबणाऱ्या’ गाडय़ांमध्ये खासगी गाडय़ांपेक्षाही कॉल सेंटर्सच्या गाडय़ांचे प्रमाण जास्त असल्याचेही चित्र आहे.
सध्या नवी मुंबई, पश्चिम उपनगरे, साकीनाका, पवई-हिरानंदानी या ठिकाणी अनेक ठिकाणी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जाळे पसरले आहे. या कंपन्यांचे कर्मचारी डोंबिवली, बोरिवली, ठाणे अशा कानाकोपऱ्यांतून येतात. त्यांना घरी सोडण्यासाठी या कंपन्या गाडय़ांचा बंदोबस्त करतात. गोरेगाव किंवा साकीनाका येथून कर्मचाऱ्याला डोंबिवलीला सोडायला गेलेली गाडी पुन्हा कंपनीत परतताना रिकामीच असते. मग या गाडीचे चालक बसस्टॉपवरच्या प्रवाशांना विचारणा करतात.
याआधी अशा प्रकारच्या ‘लिफ्ट’ला फारसा प्रतिसाद नव्हता. मात्र बसमध्ये वाढलेली गर्दी आणि वाहतूक कोंडी यांचा विचार करता प्रवासी सर्रास ही ‘कार सेवा’ स्वीकारू लागले आहेत. महापे किंवा घणसोलीहून बोरिवलीपर्यंत ५० रुपयांत हे चालक सोडतात. त्याशिवाय छोटय़ा छोटय़ा अंतरासाठीही १०-२० रुपये आकारले जातात. तर गोरेगाव ते ठाण्यापर्यंतही ५० रुपयांत येता येते. या मार्गावरील एसी बसचा तिकीट दर ९० ते १०० रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे प्रवाशांना हा गाडीचा प्रवास नक्कीच सुखाचा वाटतो.

काय काळजी घ्याल?
* गाडीत बसताना एकटेदुकटे असाल, तर सतत भ्रमणध्वनीवर जवळच्या माणसाबरोबर बोलत राहा. तुम्ही कुठे आहात, याची माहिती आपल्या जवळच्या माणसांना देत राहा.
ल्ल गाडीत बसण्याआधी शक्यतो आधी बसलेले प्रवासी आणि चालक यांच्याकडे किमान एकदा तरी नजर टाका आणि जराही संशय आल्यास गाडीत बसणे टाळा.
* शक्यतो आपल्या बरोबर कोणीतरी ओळखीचे असल्याशिवाय गाडीत बसू नका.
* नेहमी प्रवास करणारे असाल, तरी गाडीत खासगी गप्पा मारणे टाळा. उदाहरणार्थ, नोकरी कुठे करता, कुठल्या हुद्दय़ावर आहात, घर कुठे आहे, घरी कोण कोण आहेत, आर्थिक स्थिती काय आहे, इत्यादी, इत्यादी.

*  कुठे ‘हात दाखवा’?
‘हात दाखवा, गाडी थांबवा’ असा प्रकार साधारणपणे मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांवर घडतो. यात   सर्वात जास्त ‘हात’ जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर ‘दाखवले’ जातात. या रस्त्यावर सीप्झ आहे.  तेथे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. तसेच गोरेगावला जाणाऱ्या गाडय़ाही या रस्त्यानेच  जातात. त्यामुळे जोगेश्वरीच्या बाजूला हा रस्ता सुरू होतो तिथे अनेक प्रवासी या गाडय़ांमधून   आपला प्रवास सुरू करतात. त्याशिवाय महापे नाका अथवा पूर्व द्रुतगती मार्गावरील ऐरोली नाका येथे  अनेक प्रवासी पश्चिम उपनगरांत जाणाऱ्या गाडय़ांची प्रतीक्षा करीत उभे असतात. वाशी नाक्यालाही अनेक जण थांबलेले असतात. ठाण्यावरून गोरेगावला जाण्यासाठी प्रवासी साधारणपणे कॅडबरी जंक्शन किंवा तीन हात नाका येथे थांबतात. कॉल सेंटरला जाणाऱ्या गाडय़ा प्रवाशांना येथूनच ‘उचलतात’ आणि त्यांच्या इच्छित स्थळाच्या जवळपास सोडतात.
*  पर्यायी उत्पन्न म्हणून लिफ्ट
अनेकदा अनेक खासगी वाहनमालक आपल्या गाडीतून इतरांना लिफ्ट देताना आढळतात. हा प्रकार  पूर्व द्रुतगती महामार्गावर जास्त आढळतो. मोठय़ा गाडीतून एकटय़ाने जाण्यापेक्षा इतर एक-दोघांना बरोबर घेऊन जाऊ, आणि त्यांच्याकडून काही पैसेही कमावू, असा विचार केला जातो. मात्र यातही जोखीम आहेच. पण आतापर्यंत आपल्याला तरी असा अनुभव आला नाही, असे मंदार जोशी यांनी सांगितले.
*  सुरक्षेचे काय?
    ‘हात दाखवा, गाडी थांबवा’मध्ये सुरक्षेचा काहीच भरवसा नाही. हात दाखवून थांबवलेली गाडी नेमकी         कोणाची आहे, गाडीत आणखी कोण सहप्रवासी आहेत, याची खातरजमा करून घेणे शक्य नसते.             त्यातच याआधी अशा प्रकारे ‘लिफ्ट’ मागितलेल्या प्रवाशांना मार2हाण करून चालत्या गाडीतून             ढकलून देण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे हा प्रवास अजिबातच सुरक्षित नाही. सार्वजनिक             परिवहन सेवेशी तुलना केली असता, हा प्रवास नक्कीच बेभरवशाचा आहे. तरीही आज अनेक लोक         या मार्गाचा अवलंब करीत आहेत. पण काही वाईट प्रकार घडला तर शब्दश: ‘हात दाखवून अवलक्षण’     ठरेल, याची काळजी घ्यायला हवी.