जुन्या खोपटा पुलाची रचना ही दोन सांध्यामधील बेअिरगच्या हालचालींवर अवलंबून असून या दोन सांध्यांमध्ये असलेल्या बेअरिंगच खराब झाल्याने पुलाच्या दोन भागांतील सांध्यांतील अंतर वाढले असून पुलावरून ये- जा करणाऱ्या जड किंवा लहान वाहनांचे चाक या दोन भागांतील फटींमध्ये रुतून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खोपटा पुलाला नवीन पुलाचा पर्याय झाला असला तरी जुन्या पुलावरूनही वाहनांची वाहतूक सुरू आहे. खोपटा पुलाची देखभाल व दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत केली जाते.२३८ मीटरचे अंतर असलेला खोपटा पूल एकूण पाच भागांत विभागलेला आहे. या पाचही ठिकाणी जोडणीला बेअिरग असून पुलावरील जड वाहनांची संख्या वाढल्यानंतर २००५ साली या बेअिरग सार्वजनिक बांधकाम खात्याने बदल्या होत्या. त्यानंतर जड वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने पुलावरील काँक्रीटही कमी होऊन लोखंडी सळ्या दिसू लागल्या आहेत. याचा फटका दुचाकी वाहनांना सर्वात अधिक बसत असून या पुलावर त्यामुळे दुचाकी वाहन चालकांचे अपघात घडले आहेत. पुलाच्या नादुरुस्त झालेल्या बेअिरग दुरुस्त करून पुलावर डांबराचा थर टाकावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे खोपटा येथील ग्रामस्थ संजय ठाकूर यांनी केली आहे. या संदर्भात उरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता ए.आर.राजन यांच्याशी संपर्क साधला असता खोपटा पुलाच्या बेअिरग खराब झाल्या असून त्या बदलण्यासाठी ४५ लाखांच्या किमतीची निविदा मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आली असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास राजन यांनी व्यक्त केला आहे. तसेच डिसेंबर २०१४ पर्यंत पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करू असेही त्यांनी सांगितले.