जटवाडा रस्त्यावरील बशीर कॉलनी येथील गॅरेजमध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटानंतर सोमवारी सकाळी न्यायवैद्यक चाचणी करणाऱ्या तज्ज्ञांच्या पथकाने तेथील नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. दरम्यान, हा स्फोट केवळ औद्योगिक अपघात स्वरूपातील होता, असे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले. स्फोटामागे कोणतीही घातपाताची शक्यता नाही. तशी खातरजमा झाली तरी कोणत्या कारणाने स्फोट झाला, हे तपासणीनंतरच समजू शकेल, असेही त्यांनी सांगितले.
रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास शक्तिशाली स्फोटात माजिदखान हयातखान (वय ५०), शेख रफीक (वय ३१), शेख मुजफ्फर शेख अहमद (वय २२), शहजादखान सिराजखान (वय ३) या चौघांचा मृत्यू झाला, तर अन्य सातजण जखमी झाले. स्फोटाची धास्ती घेऊन सोमवारीही अनेकांनी दुकाने उघडली नाहीत. कानाचे पडदे फाटतील एवढा मोठा आवाज झाल्याने या भागातील वृद्ध नागरिकांनी रक्तदाब वाढल्याची तक्रार केली. गॅरेजमध्ये काम करणारे बहुतांश मजूर बिहारमधून आले आहेत. स्फोट झाला, त्याच्या भोवताली असणाऱ्या व्यावसायिकांना हा हादरा एवढा मोठा होता की, भीतीने त्यांनी सोमवारी कामाला दांडी मारली. एक रिक्षावाला म्हणाला, अजूनही कानात तो आवाज घुमतो आहे. आज कशातही मन लागले नाही, त्यामुळे रिक्षाच बाहेर काढली नाही. स्फोट झालेल्या गॅरेजमध्ये काही दिवसांपूर्वी कुलर बनवले जायचे. त्यानंतर प्लास्टिकच्या खुच्र्या बनवण्याचा प्रयत्न केला आणि अलीकडेच स्टीलचे फर्निचर बनविले जात होते. रात्री एका बॅरेलला उघडताना हा स्फोट झाला. यात ‘एच२ओ२’ नावाचे रसायन होते, असे सांगितले जाते. दरम्यान, घाटी रुग्णालयात दाखल जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.