भरधाव कंटेनर व क्रुझर जीपची समोरासमोर धडक होऊन जीपचालक जागीच ठार, तर अन्य १५ जण जखमी झाले. यातील पाचजणांची प्रकृती अत्यवस्थ आहे. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास शहरातील पर्यायी मार्गावर हा अपघात घडला. जखमींमध्ये ४ मुले व ६ महिलांचा समावेश आहे.
केज तालुक्यातील शिरूर येथील कुलकर्णी व बेदरकर कुटुंबीय जीपमधून (एमएच २१ व्ही ४२६४) तुळजापूरला निघाले होते. याच वेळी तुळजापूरहून औरंगाबादला निघालेल्या कंटेनरची (एमएच ४ सीए २१०५) समोरासमोर धडक झाली. उस्मानाबाद बायपासवर संकेत ढाब्याजवळ हा प्रकार घडला. जीपचालक भगवान रामभाऊ सुळे (वय ३५, बारसवाडी, तालुका अंबड, जिल्हा जालना) जागीच ठार झाला.
प्रशांत जवळकर (वय ४२), प्राजक्ता श्रीधर कुलकर्णी (वय १७), प्रणव प्रशांत जवळकर (वय १२), पियुष प्रशांत जवळकर (वय १०), शोभा बद्रीनाथ कुलकर्णी (वय ४२), श्यामा बद्रीनाथ कुलकर्णी (वय १६), मधुकर बीडकर (वय ६५), मोहिनी सचिन बेदरकर (वय १८), सुनंदा सुभाष बेदरकर (वय ५०), संदीप सीताराम बेदरकर (वय २०), मनोज काशिनाथ बेदरकर (वय २४), अदिती अशोक बेदरकर (वय ५), सुरेखा सीताराम बेदरकर (वय ३६), मानसी मनोज बेदरकर (वय ३), प्रेमला विश्वनाथ बेदरकर (वय ६०) हे जखमी झाले. यातील ५ गंभीर जखमींना उपचारार्थ सोलापूरला पाठविले, तर उर्वरित १०जणांवर उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.