14 December 2017

News Flash

शालेय विद्यार्थी वाहतूक रिक्षाला अपघात; १ ठार

शहरातील गंगापूर रोड परिसरातील अंतर्गत रस्त्यांवरील एका धोकादायक चौफुलीवर गुरूवारी सकाळी शालेय विद्यार्थी वाहतूक

प्रतिनिधी, नाशिक | Updated: February 15, 2013 2:24 AM

*     डॉन बास्को स्कूलचा एक विद्यार्थी ठार; पाच जखमी
*     गंगापूर रोड परिसरातील  घटना
शहरातील गंगापूर रोड परिसरातील अंतर्गत रस्त्यांवरील एका धोकादायक चौफुलीवर गुरूवारी सकाळी शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाची आणि मालमोटारीची धडक झाल्याने पाच वर्षीय बालकास प्राण गमवावे लागले. अपघातात चार विद्यार्थ्यांसह एकूण पाच जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मृत व जखमी विद्यार्थी डॉन बास्को स्कूलमधील केजीच्या वर्गातील आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलींचाही समावेश आहे. या चौफुलीत गतिरोधक बसविण्यास परवानगी द्यावी म्हणून स्थानिक नगरसेविकेने काही दिवसांपूर्वीच केलेल्या मागणीकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केले नसते तर कदाचित हा अपघात झाला नसता, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
निर्मला कॉन्व्हेन्ट स्कुलकडून एसटी कॉलनीकडे जाणारा रस्ता आणि पंपिंग स्टेशनकडून मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या लगतच्या परिसरातून नव्याने झालेला रस्ता, हे रस्ते परस्परांना डीके नगरशेजारील परिसरात एकमेकांना छेदतात. या ठिकाणी तयार झालेला चौक त्यामुळेच अधिक धोकादायक झाला आहे. याच ठिकाणी गुरूवारी सकाळी हा अपघात झाला. स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रिक्षा या चौकात आली असता पंपिंग स्टेशनकडून येणाऱ्या मालमोटारीशी चौकातच धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, रिक्षा १५ ते २० फूट फरफटत गेली.
चार ते पाच वर्षांचे काही विद्यार्थी रिक्षाबाहेर फेकले गेले, असे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. या अपघातात भविष्य विश्वनाथ सुवर्णा हा विद्यार्थी जागीच ठार झाला. तर श्लोक अमोल आडोळकर, चिन्मयी अतुल देशपांडे, सायली बापट, इशान खारपुरे या विद्यार्थ्यांसह चालक सुरेश जाधव हे पाच जण जखमी झाले.
अपघातानंतर मालमोटार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. परिसरातील काही युवकांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि बेदम चोप दिला. या गोंधळात जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्याकडे दुर्लक्ष झाले. दरम्यानच्या काळात पोलीस, स्थानिक नगरसेविका सीमा हिरे, महेश हिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन विद्यार्थी किरकोळ जखमी होते. भेदरल्यामुळे ते अव्याहतपणे रडत होते. स्थानिक महिलांनी आधार देऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले. या घटनेची माहिती डॉन बास्को स्कूलमध्ये समजल्यानंतर व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे वृत्त समजताच पालकांनी स्कूलमध्ये धाव घेतली. अंतर्गत रस्त्यावरून वाहतूक करताना अवजड वाहने वेग मर्यादा पाळत नाहीत. भरधाव मालमोटारीमुळे हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येते. या चौकात गतिरोधक असता तर अपघात टळला असता असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, या अपघातप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालमोटार चालकास अटक करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले
अपघातास वाहतूक पोलिसांची अनास्था जबाबदार
ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या धोकादायक चौकातील रस्त्यांवर गतिरोधक बसविण्याची मागणी स्थानिक नगरसेविका सीमा हिरे यांनी महिन्यापूर्वीच केली होती. तथापि, वाहतूक पोलीस विभागाने या गतिरोधकास अजुनही मंजुरी दिलेली नाही. ही परवानगी मिळाली असती तर एका विद्यार्थ्यांचे प्राण वाचले असते, अशी स्थानिकांची प्रतिक्रिया आहे. या भागात विविध शाळा आणि महाविद्यालये असल्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी असते. त्यामुळे या चौकात गतिरोधकाची मागणी करण्यात आल्याचे हिरे यांनी नमूद केले. शहरात कुठेही गतिरोधक करावयाचा असल्यास वाहतूक पोलिसांकडून आधी परवानगी घ्यावी लागते. वाहतूक पोलिस विभागाची अनास्था या अपघातास जबाबदार ठरल्याची तक्रार केली जात आहे.
सुशिक्षित वर्गाची असंवेदनशीलता
शहरातील अंतर्गत रस्ते भरधाव वाहतुकीसाठी किती धोकादायक ठरू शकतात, याची प्रचिती गुरूवारी गंगापूर रोडवरील एका धोकादायक चौकात झालेल्या अपघातावरून आली असताना अशा बिकट प्रसंगात सुशिक्षित वर्गाने दाखविलेली असंवेदनशीलता सर्वानाच सून्न करून गेली. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली. परंतु जखमी बालकांना तत्परतेने रुग्णालयात नेण्याची संवेदनशीलता दाखविली गेली नाही. अखेर अपघाताने भेदरलेल्या मुलांची अवस्था पाहून काही महिला जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी पुढे आल्यावर मग बघ्यांना जाग आली. मग मिळेल त्या वाहनातून जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी सुशिक्षितांचा कित्ता काही खासगी रुग्णालयांनी गिरविला. घटनास्थळालगतच्या काही रुग्णालयांनी जखमी विद्यार्थ्यांना दाखल करण्यास नकार दिला. परिणामी, त्यांना इतर खासगी रुग्णालयांत न्यावे लागले. रिक्षातील दोन विद्यार्थ्यांंना किरकोळ मार लागला होता. परंतु, अपघाताच्या भीषणतेने ते प्रचंड भेदरले होते. जखमी मुलांना रुग्णालयात पाठविण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांशी महिलांनी संपर्क साधला. त्यानंतर पालकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या विद्यार्थ्यांना घरी नेले. उच्चभ्रु वसाहतीचा परिसर म्हणून गंगापूर रोड ओळखला जातो. सुशिक्षितवर्ग या परिसरात मोठय़ा प्रमाणात वास्तव्यास आहे. एरवी सुशिक्षितपणाचा टेंभा मिरविणारा हा वर्ग बिकट प्रसंगी काही करण्याची वेळ आल्यावर कशी असंवेदनशीलता दाखवितो ते यावेळी पहावयास मिळाले. स्थानिक महिलांनी मात्र स्वत: पुढाकार घेण्याची तयारी दर्शवून बघ्यांमधील पुरूषांना सणसणीत चपराक दिली.

First Published on February 15, 2013 2:24 am

Web Title: accident to school students tranceport rickshaw one died