News Flash

तक्रारीचा घोर पालकांना, अन् पोलिसांनाही!

मुंबईतील महत्त्वाकांक्षी पूर्व मुक्त मार्ग हा फक्त चारचाकी वाहनांसाठी आहे.

| November 6, 2013 07:34 am

मुंबईतील महत्त्वाकांक्षी पूर्व मुक्त मार्ग हा फक्त चारचाकी वाहनांसाठी आहे. दुचाकींना त्यावर बंदी आहे. तरीही अवघ्या ५ महिन्यांत ५ दुचाकीस्वार मुक्त मार्गावरील अपघातांत प्राणाला मुकले आहेत. ऐन दिवाळीत, रविवारी, झालेल्या अपघातात शशी साळवे आणि नरेश भंडारी हे दोघे अनुक्रमे १८ व १९ वर्षांचे तरुण मृत्युमुखी पडले. असे अपघात होऊ नयेत यासाठी आता पोलिसांना आणखी एक नवे काम लागले आहे. दुचाकीस्वार मुक्त मार्गावर येऊच नयेत यासाठी या मार्गाच्या दोन्ही टोकांवर आता अहोरात्र पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.
सुखवस्तू घरांप्रमाणेच मध्यमवर्गीय कुटुंबांतील तरूण मुलेही हल्ली हाती चांगली बाईक आली की फुरफुरू लागतात. मग रात्री ते सुसाट निघतात. जे. जे. उड्डाणपूल, स्वा. सावरकर मार्ग, पूर्व व पश्चिम द्रुतमार्ग आदी ठिकाणे त्यांच्यासाठी नंदनवनच. त्यात आता भर पडली आहे पूर्व मुक्त मार्गाची. या संपूर्ण मार्गावर एकही सिग्नल नाही, अडथळा नाही. मग काय १०० च्या खाली वेग  आणायची गरजच नाही. कोणी किती वेगाने जावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु या सुसाटस्वारांना होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आता अहोरात्र ठेवण्यात येणार आहे. आधीच संख्येने कमी असलेल्या पोलिसांना आता हे जास्तीचे काम लागले आहे. या सुसाटस्वारांमुळे पालकांची तर झोप उडतेच; पण आता पोलिसांचीही झोप त्यांना हराम केली आहे.
पूर्व मुक्त मार्गामुळे पूर्व उपनगरांतील प्रवाशांची वेळेची मोठी बचत होऊ लागली आहे. पण मुक्त मार्गावरून सुसाट वेगाने जाणाऱ्या मोटारसायकलस्वारांसाठी हा मुक्तमार्ग जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. बंदी असूनही मोटारसायकलस्वार या मार्गावरून जात असल्याने त्यांना रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे ठाकले आहे. त्यामुळेच आता दिवसाप्रमाणे रात्रीही वाहतूक पोलीस नेमण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
पूर्व मुक्त मार्ग १७ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गाची रचना चारचाकी वाहनांचा वेग लक्षात घेऊन बनविण्यात आली आहे. त्यामुळे मोटारसायकलींना या मार्गावर बंदी आहे. परंतु बंदी न जुमानता मोटारसायकलस्वार बेदरकारपणे या मार्गावरून मोटारसायकली चालवत असतात. आतापर्यंत या मुक्त मार्गावर मोटारसायकलींचे अपघात होऊन पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मोटारसायकली रोखण्यासाठी पांजरपोळ आणि पी. डिमेलो रोड या दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. परंतु रात्री पोलीस नसताना मोटारसायकलस्वार या मार्गावरून मोटारसायकली नेत असल्याचे दिसून आले आहे.
वाहतूक पोलिसांनी हा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. मोटारसायकलस्वारांच्या वाढत्या अपघाताच्या घटना या चिंतेचा विषय बनला आहे. मार्ग जेथून सुरू होतो आणि जेथे संपतो त्या दोन्ही ठिकाणी दिवसा आम्ही भरपूर पोलीस बंदोबस्त लावला आहे. पण यापुढे आता रात्रीच्या वेळीही बंदोबस्त तैनात करणार आहोत, असे पोलीस उपायुक्त (वाहतूक) प्रताप दिघावकर यांनी सांगितले. पोलिसांची नजर चुकवून एखादा मोटारसायकस्वार गेला तर त्याचा नंबर टिपून त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
ज्यांचे अपघात होतात, ते ‘जॉय रायडर’ असतात. म्हणजे गंमत म्हणून सुसाट जाणारे मोटारसायकलस्वार. आजवर पूर्व मुक्त मार्गावर मोटारसायकलींचे जे अपघात झाले, ते सर्व अशा ‘जॉय रायडर’चे होते आणि त्यापैकी कुणीही हेल्मेट घातलेले नव्हते याकडे दिघावकर यांनी लक्ष वेधले. मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने हा मुक्त मार्ग बांधला आहे. ताशी ५० किलोमीटर अशी वेगमर्यादा वाहनांना घालून दिलेली आहे. एमएमआरडीएने सुद्धा मोटारसायकलस्वारांना प्रवेश निषिद्ध असे फलक लावण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत.
आपली सुरक्षा आपल्या हातात.
जे.जे. उड्डाणपुलावरील धोकादायक वळणांमुळे तेथे मोटारसायकलींचे अपघात होतात. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तेथे दुचाकींना बंदी घालण्यात आली आहे आणि ते रोखण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात केलेले असतात. पण वाहतूक पोलीस असतानासुद्धा त्यांना न जुमानता मोटारसाकलस्वार त्यावरून जात असतात. प्रत्येक वेळी त्यांना रोखणे शक्य नसते. वाहने वेगात असतात त्यामुळे त्यांना रोखताना आमचा जीव धोक्यात जाऊ शकतो, असे येथे डय़ुटीवर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी सांगितले. परंतु दंडापेक्षा आपले जीवन बहुमूल्य आहे हे ओळखून मोटारसायकलस्वारांनी या मार्गावरून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
२१ ऑक्टोबर २०१३ – पहाटे ३ च्या सुमारास मोटारसायकलीवरून जाणाऱ्या तिघांचा अपघात. रमझान शेख (२५), रहिम आगा (२३) या दोघांचा मृत्यू तर आकाश सावंत हा तरूण जखमी. या अपघातात एक जण पुलावरून खाली पडला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 7:34 am

Web Title: accidents on eastern express highway
Next Stories
1 रायगड जेव्हा (दिवाळीत) जागा होतो!
2 इमारतीची सदोष दुरुस्ती : कंत्राटदाराला ग्राहक आयोगाचा दणका
3 ‘यशस्वी भव’’उत्कृष्ट यशाची हमी’
Just Now!
X