आरोपी पळाल्याची एक घटना याआधी घडूनही हुडकेश्वर पोलिसांनी कुठलीच प्रतिबंधात्मक व्यवस्था केली नसल्याचे उघड झाले असून आरोपी पलायनास जबाबदार असलेल्यांना पाठीशी घातले जात असल्याचे उघड झाले आहे.
ऑगस्ट २०१३ मध्ये हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या डीबी स्कॉडने ताब्यात घेतलेला एक कुख्यात चेन स्नॅचिंग व घरफोडीचा आरोपी पोलीस ठाण्याच्या संरक्षण भिंतीवरून उडी घेऊन पळून गेला होता. त्या भिंतीची उंची वाढवावी असे हुडकेश्वर पोलिसांना वाटले नाही. त्यानंतर आता ५ मार्चला संजय शाहू नावाचा आरोपी त्याच संरक्षण िभतीवरून उडी घेऊन पळाल्याचे हुडकेश्वर पोलीस सांगत
आहेत. आज त्यास चार दिवस उलटले तरी त्या संरक्षण भिंतीची उंची वाढविण्यात आलेली नाही. ‘घर मालकाला सांगितले आहे’ असे यावर हुडकेश्वर पोलिसांचे उत्तर आहे. आरोपी पलायनाचा गुन्हा गुरुवारी ५ तारखेलाच दाखल झाल्याचे पोलिसांनी काल सांगितले. मात्र, रोज दिवसातून तीनवेळा आढावा घेणाऱ्या पोलिसांच्या माहिती कक्षापासून नेमके याच गुन्हाची माहिती दिली गेली नाही. दुसऱ्या दिवशी सुटी, शनिवार, रविवार आल्याने ते राहून गेले, असे यावर हुडकेश्वर पोलिसांचे म्हणणे
आहे.
ऑगस्ट २०१३ मध्ये तत्कालीन डीबी स्कॉडची जबाबदारी असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाने तेव्हा पळून गेलेल्या आरोपीचा दिवस-रात्र शोध घेऊन चार दिवसात अटक केली. मात्र, हलगर्जीपणा केल्याप्रकरणी त्या सहायक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले होते. आताही ५ मार्चला आरोपी पळाला. आज चवथ्या दिवशी दुपारी बारा ते एक वाजताच्या दरम्यान हुडकेश्वरचे पोलीस अधिकारी, डीबी स्कॉडचे सहायक निरीक्षक हे त्यांच्या खोलीत बसून होते.
आरोपी पळून चार दिवस उलटले असले तरी त्याला अटक कराविशी हुडकेश्वर पोलिसांना वाटत नसल्याचे हे द्योतक आहे. आरोपी पळून गेला हे खरे असेल तर पलायनास जबाबदार असलेल्यांना पाठीशी घातले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पळून गेलेल्या आरोपीचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने हुडकेश्वर पोलीस संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.