इचलकरंजीतील गावभाग पोलिसांना घरफोडय़ाच्या दोन घटनांतील आरोपींना पकडण्यात यश आले आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण अर्धा किलो चांदीचे ११६ मोदक व ३ मोबाइल हँडसेट असा सुमारे ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, मूळ चंदूर येथील तर सध्या लालनगर येथे वास्तव्यास असलेला हृषीकेश ऊर्फ बबलू शांताराम म्हेतर याला आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सहकारनगर बसस्टॉपवर पोलिस हवालदार उदय पाटील यांनी संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करता म्हेतर याने दीड महिन्यापूर्वी कोल्हापूर येथील गुजरी पेठेतील अनिल गुंदेशा यांच्या सराफी दुकानातील चांदीचे मोदक आणि इचलकरंजीतील गौतम काजवे यांच्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून मोबाइल चोरल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यातील त्याचा साथीदार सागर सुभाष लाखे (वय २३) याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. आज पकडलेला म्हेतर हा अट्टल गुन्हेगार असून त्याने यापूर्वी येथील सन्मती बँकेत चोरीचा प्रयत्न केला होता. तर सांगली, इस्लामपूर या ठिकाणीही चोऱ्या केल्या आहेत, अशी माहिती गावभागचे पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांनी दिली. पोलिसांनी त्याला कोल्हापुरातील बालसुधारगृहात पाठविले आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार एस. आय. मोर्ती, जगन्नाथ पाटील, पांडू पाटील, बाळासाहेब कोळी आदींसह गुन्हे शोधपथकातील कर्मचाऱ्यांनी केली.