29 September 2020

News Flash

मध्यवर्ती कारागृहातून आरोपीचे पलायन

आरोपी पळून जाऊ नये, यासाठी कारागृह अथवा पोलिसांकडून पुरेशी खबरदारीच घेतली जात नसल्याचे अलीकडे घडू लागलेल्या आरोपींच्या पलायनांच्या घटनांवरून उघड झाले आहे.

| September 19, 2014 03:10 am

आरोपी पळून जाऊ नये, यासाठी कारागृह अथवा पोलिसांकडून पुरेशी खबरदारीच घेतली जात नसल्याचे अलीकडे घडू लागलेल्या आरोपींच्या पलायनांच्या घटनांवरून उघड झाले आहे.  
मध्यवर्ती कारागृह परिसरातील शेतातून सूरज श्यामलाल अरखेल हा जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी बुधवारी दुपारी पळून गेला. दोन दिवसांपूर्वी बडनेराजवळ रेल्वे गाडीतून उडी घेऊन एक कैदी पळून गेला. गेल्या आठवडय़ात मेडिकल रुग्णालयात उपचार घेत असलेला कैदी पळून गेला. बैद्यनाथ चौकाजवळून एक आरोपी पळून गेल्याची घटना महिन्याभरापूर्वी घडली. जिल्हा न्याय मंदिर इमारतीच्या जिन्यातून उडी घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात एक आरोपी जखमी झाला. मुळात आरोपी अथवा कैदी पळून जाण्याच्या घटना नव्या नाहीत. त्या अधूनमधून घडत असतात. असे
प्रकार टाळण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
मंगळवारी रात्री कारागृह प्रशासनाने अचानक तपासणी केली असता आरोपी सूरजजवळ मोबाईल सापडला होता. मोबाईल जप्त करा, मात्र सीम कार्ड परत करा, अशी विनवणी त्याने केली होती. ते परत देण्याचा प्रश्नच नसल्याने त्याने सीम कार्ड परत दिले नाही तर पळून जाण्याची त्यानी धमकी दिली होती. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याला बेदम मारहाण केल्याचे समजते. मोबाईलवर बोलण्यासाठी किमान तीन हजार रुपये द्यावे लागत असल्याचे तसेच कधीही कारागृहात न परतणार नसल्याचे सांगत तो त्याच्या प्रेयसीबरोबर पळून गेल्याचे सांगितले जाते. त्याने धमकी दिली असतानाही प्रशासनाने खबरदारी न घेतल्याने त्याचे पलायन यशस्वी झाल्याचे उघड झाले.  सूरजला २४ डिसेंबर २०१३ रोजी खुल्या कारागृहात ठेवण्याचे आदेश होते. खुल्या कारागृहात असला तरी त्याला मोकळे स्वातंत्र्य नसते. काल सूरज मध्यवर्ती कारागृह परिसरात मागील शेतात काम करीत होता. शौचास जाण्याचा बहाणा करून तो पळून गेला. तेथे काही रक्षक असले तरी ते पुरेसे नव्हते. कैदी पळून गेल्याचे निदर्शनास येताच संकेतदर्शक घंटाही वाजविण्यात आली नसल्याचे लोक सांगतात. कारागृह ते न्यायालय ने-आण करतानाही पुरेसे पोलीस नसतात, असेही आढळून आले आहे. एकंदरित पुरेशी खबरदारी घेतली जात नाही, हे अशा घडणाऱ्या घटनांवरून स्पष्ट होते. तरीही त्यापासून बोध घेतला जात नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2014 3:10 am

Web Title: accused escapes from central jail
Next Stories
1 तीन वर्षांनंतर शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
2 नवरात्रोत्सव, दिवाळीनिमित्त नागपूरमार्गे विशेष गाडय़ा
3 जोगेंद्र कवाडे यांची २९ जागांची मागणी
Just Now!
X