पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून आपल्या सख्ख्या भावाचा निर्घृणपणे खून केल्याबद्दल भीमराव गणपत जाधव (वय ४७, रा. व्होळे, ता. माढा) यास सोलापूरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा ठोठावली. त्याची पत्नी मंगल जाधव हिची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.
या खटल्याची पाश्र्वभूमी अशी, की आरोपी भीमराव जाधव व मृत दिनकर जाधव (वय ४५) यांच्यात पूर्ववैमनस्य होते. शेतातील पिकांतून बैलगाडी घालून नुकसान केल्याच्या कारणातून दोघा भावांमध्ये भांडण झाले होते. दि. २ मे २०११ रोजी मृत दिनकर जाधव हा आपल्या घरात स्वत:ची पत्नी मंगला हिला शिवीगाळ करीत होता. त्या वेळी आरोपी भीमराव हा गैरसमजुतीतून जाब विचारण्यास गेला असता त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्या वेळी मृत दिनकर याच्यावर आरोपी भीमराव याने काठी व दगडाने हल्ला चढविला. यात तो गंभीर जखमी होऊन मरण पावला. या वेळी त्यास वाचविण्यासाठी पत्नी मंगला व दोन मुले धावून आली असता त्यांनाही भीमराव याने धमकावले. याप्रकरणी भीमराव व त्याची पत्नी शीलाबाई जाधव यांच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी सोलापुरात अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. मराठे यांच्यासमोर झाली.
या खटल्यात सरकारतर्फे अ‍ॅड. आनंद कुर्डूकर यांनी सहा साक्षीदार तपासले. खुनाचा प्रकार मृत दिनकर याची पत्नी व दोन्ही मुलांनी प्रत्यक्ष पाहिला होता. परंतु आरोपीचे घर हे मृताच्या घराशेजारीच असल्याने त्याचे कुटुंबीय भयग्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने फिर्याद दाखल करता आली नाही. त्यांना घरातील भांडणे असल्याने तक्रार देऊ नका असे त्यांच्या नातेवाइकांनी बजावले होते. त्यामुळे टेंभुर्णी पोलिसात फिर्याद उशिरा दिली गेली. मृत दिनकर याच्या लहान मुलांनी दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. त्यावर विश्वास ठेवून न्यायालयाने आरोपी भीमराव जाधव यास दोषी धरले, तर अन्य आरोपी व त्याची पत्नी शीलाबाई हिला निर्दोष सोडण्यात आले. या खटल्यात मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. जयदीप माने यांनी काम पाहिले, तर आरोपीतर्फे अ‍ॅड. रवींद्र कुलकर्णी (पुणे) यांनी बचाव केला.