कोअर बँकिंगच्या नावाखाली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक मंडळ बँकेची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप करत व या खर्चाच्या स्पष्टीकरणाची मागणी करत विरोधी गुरुकुल मंडळाने, आज सायंकाळी बँकेच्या नगरमधील मुख्य कार्यालयासमोर प्रतीकात्मक ‘फटके मारो’ आंदोलन केले. कोअर बँकिंगच्या दोन कोटी रुपयांचा संचालक मंडळाने येत्या १५ दिवसांत हिशेब दिला नाहीतर बँकेच्या संचालकांना दिसेल तेथे काळे फासले जाईल, असा इशाराही शिक्षक नेते संजय कळमकर यांनी या वेळी बोलताना दिला.
यासंदर्भातील गुरुकुलचे मागण्यांचे निवेदन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केशव ढाकणे यांनी स्वीकारले. भ्रष्ट संचालकांना निवडुन देणारे सदिच्छा मंडळ नेमके काय करत आहे, ते कोणाच्या ताब्यात आहे, या पापाची नैतिक जबाबदारी सदिच्छा मंडळावरही येते, अशी टीका कळमकर यांनी केली.
केवळ ४० ते ४५ लाख रुपयांत होणाऱ्या कोअर बँकिंगसाठी संचालक मंडळाने २ कोटी रुपयांची तरतूद करून आर्थिक घोटाळा केला आहे. निवडून आल्यापासून या संचालकांनी लूटच चालवली आहे, त्यामुळे त्यांना निवडुण देणाऱ्या शिक्षक सभासदांवर प्रायश्चित म्हणून स्वत:लाच फटके मारून घेण्याची वेळ आली आहे, सभासदांची मागणी असतानाही कर्जमर्यादेत वाढ न करता कर्जावरील व्याजदरात वाढ करून बँकेने नफा कमावला. या नफ्यावर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली संचालकांनी डल्ला मारला, कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा बोनस देणारे संचालक सभासदांच्या ठेवीवर अत्यल्प व्याज देतात, छपाई, रंगरंगोटी, फर्निचरच्या माध्यमातून लाखो रुपयांची उधळपट्टी सुरु आहे, कोअर बँकिंगची ऑर्डर नेमकी कोणाला दिली, त्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी कशाला लागतो, याची उत्तरे द्यावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
गुरुकुलचे अध्यक्ष नितीन काकडे, जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष संजय धामणे, अनिल आंधळे, विजय अकोलकर, अशोक कानडे आदींची भाषणे झाली. गुरुकुलने बँकेचे संचालक मंडळ पैशावर डल्ला मारुन पळ काढत आहेत, हे दर्शवणारे व्यंगचित्र फलकावर सादर केले होते, तसेच विडंबनात्मक कविताही सादर केली होती.