13 November 2018

News Flash

आचार्य पार्वतीकुमारांची कलाकृती अर्धशतकानंतर रंगमंचावर

‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विविध कालखंडाचे वर्णन असलेला व आचार्य पार्वतीकुमारांच्या नृत्याविष्काराने तो सादर करणारा खजिना तब्बल अर्धशतकानंतर

| November 20, 2013 08:30 am

‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’च्या नृत्याविष्काराची पुन्हा ‘खोज’
‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विविध कालखंडाचे वर्णन असलेला व आचार्य पार्वतीकुमारांच्या नृत्याविष्काराने तो सादर करणारा खजिना तब्बल अर्धशतकानंतर पुन्हा खुला झाला आहे. पार्वतीकुमार यांची तीन दशके शिष्या राहिलेल्या व मुंबईतील एकमेव नृत्य महाविद्यालय चालविणाऱ्या डॉ. संध्या पुरेचा यांच्या पुढाकाराने नेहरूंच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने येत्या गुरुवारी ६० हून अधिक कलाकार भारतीय इतिहासाची नव्याने ‘खोज’ करणार आहेत.
भारताच्या विविध कालखंडाचे वर्णन करणाऱ्या नेहरूंच्या या साहित्यकृतीवर शांती बर्धन यांनी १९४७ मध्ये सर्वप्रथम नृत्याविष्कार सादर केला. मात्र आचार्य पार्वतीकुमार यांनी १९५० ते १९६४ पर्यंत त्याचे खऱ्या अर्थाने अनेक प्रयोग केले. त्यांचा हा नृत्याविष्कार स्वत: पंडित नेहरूंनीदेखील पाहिला. यानंतर त्याचे प्रयोग बंद झाले होते. आता संध्या पुरेचा ही कलाकृती पुन्हा रंगमंचावर आणत आहेत.
नेहरू सेंटरच्या सहकार्याने येत्या २१ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या या विषयावरील नृत्य प्रकारात संध्या पुरेचा यांच्या महाविद्यालयातील विद्याथ्यरंसह अन्य राज्यातील कलाकार सहभागी होत आहेत. दीड तासांहूनही अधिक वेळ चालणाऱ्या या नृत्यासाठीची वेशभूषा आदी तयारी संध्या यांच्या करी रोड येथील महाविद्यालयात जोरदार सुरू आहे.
२१ नोव्हेंबरनंतर हे नृत्यप्रयोग मध्य प्रदेश आणि नवी दिल्लीतही होणार असल्याचे डॉ. संध्या यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. आचार्यजींच्या नृत्यकृतीत ३० कलाकार असायचे; मात्र आम्ही जवळपास दुप्पट केले आहेत, असेही त्या म्हणाल्या. डॉ. संध्या यांनी स्थापन केलेल्या ‘सरफोजीराजे भोसले सेन्टर ट्रस्ट’मार्फत चालविल्या जाणाऱ्या ‘भरत कला व संस्कृती महाविद्यालया’तून गेल्या दहा वर्षांत ५ हजारांहून अधिक विद्यार्थी नृत्य उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत.

‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा एक आत्म्याचा प्रवास आहे. खूप मागचा आणि खूप पुढचा विचार शरीर करू शकत नाही. युगायुगांचा विचार करण्याची ताकद फक्त आत्म्यातच आहे. ते सारे या साहित्याने केले आहे. एका संप्रदायाशी त्याची नाळ जोडली आहे. मानवाच्या विकासाच्या प्रक्रियेचे मनन, चिंतन त्यातून झाले आहे. नृत्याच्या माध्यमातून ते मांडणे खूपच आव्हानात्मक आहे.
  –   डॉ. संध्या पुरेचा

First Published on November 20, 2013 8:30 am

Web Title: acharya parvati kumar art on theater once again
टॅग Mumbai 2