News Flash

तरुणाईच्या जिज्ञासेचा मोहर

त्या ची संशोधनाची जिज्ञाासा बालवयातच फुलली. १९९८मध्ये शालेय वयात त्याने ‘गणपती विसर्जनाचा मासुंदा तलावावर होणारा परिणाम’ या विषयावर संशोधन केले आणि त्याचे देशभर कौतुक झाले.

| January 15, 2015 12:38 pm

7त्या ची संशोधनाची जिज्ञाासा बालवयातच फुलली. १९९८मध्ये शालेय वयात त्याने ‘गणपती विसर्जनाचा मासुंदा तलावावर होणारा परिणाम’ या विषयावर संशोधन केले आणि त्याचे देशभर कौतुक झाले. आज त्याने अमेरिकी विद्यापीठातून पीएच.डी. मिळविली असून, संशोधन क्षेत्रातील त्याची वाटचाल आजही सुरू आहे. सध्या मधुमेह विकारासंदर्भात त्याचे संशोधन सुरू आहे. ही कहाणी आहे, निरंजन करंदीकर या संशोधकाची. बालवैज्ञानिक ते वैद्यकीय संशोधक असे मार्गक्रमण करणाऱ्या त्याच्या जिज्ञासा वृत्तीची.
राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत.. या शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांनी ‘गणपती विसर्जनाचा मासुंदा तलावावर होणारा परिणाम’ या विषयावर प्रकल्प सादर केला होता. हा प्रकल्प केवळ ठाणे शहराच्या नव्हे, राज्याच्या नव्हे, तर देशाच्या पर्यावरण चळवळीतील एक मोठा क्रांतिकारी टप्पा ठरला. या प्रकल्पाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या वैज्ञानिक प्रकल्पाचे सामाजिक चळवळीत रूपांतर झाले होते. या संशोधन प्रकल्पांचे दस्तवेज सामाजिक कार्यकर्ते दिवंगत नरेंद्र दाभोलकर यांनी जलप्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केलेल्या जनहित याचिकेत दाखला म्हणून वापरले गेले. या खटल्याच्या निकालपत्रात मा. न्यायमूर्तीनी केंद्र सरकारला जलनीती कायदा बनविण्याचे आदेश दिले होते. याचा परिणाम म्हणून भारत सरकारने जलप्रदूषण कायदा लागू केला. आज पर्यावरणपूरक गणपती उत्सव हा सर्वतोमुखी झालेला शब्द आहे.
6देशभर गाजलेल्या या प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या निरंजन करंदीकर याने आधीच्या वर्षी म्हणजे १९९७मध्ये राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत ‘मधल्या सुटीतील डबा’ हा प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पात शालेय विद्यार्थ्यांचा वाढत्या वयात, त्यांना लागणारी ऊर्जा व त्यासाठी लागणारे कॅलरीयुक्त अन्न, त्याची चव तयार करण्यासाठी लागणारा वेळ अशा सर्व घटकांचा अभ्यास करून मधल्या सुट्टीच्या डब्याचा आठवडय़ाचा मेनू तयार केला होता. त्याच्या या संशोधनाचेही कौतुक झाले होते.
बी. एन. बांदोडकर महाविद्यालयातील तल्कालीन प्राध्यापिका डॉ. माधुरी पेजावर, डॉ. नागेश टेकाळे आणि आय. आय. टी. मुंबईचे प्राध्यापक डॉ. श्याम असोलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या बालवैज्ञानिकांनी हे संशोधन केले होते. शाळकरी वयात पेरलेले हे संशोधनाचे बीज तरुणपणी बहरले. या प्रकल्पात सहभागी झालेले सर्वच विद्यार्थी आज उच्चविभूषित असून विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. निरंजनसोबत सहभागी झालेले अमोघ वैशंपायन आणि वरुण चौबळ हे सहकारी वैद्यकीय अभ्यासक्रमात उच्च पदवीधर झाले आहेत, तर देवदत्त जोशी हे अमेरिकेत एम.एस. पदवी संपादन करून अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात कार्यरत आहेत.
निरंजन करंदीकरने अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक इंजिनीअिरगमध्ये मास्टर ऑफ सायन्स (एम. एस.) ही पदवी मिळविली. त्याच विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली, पीएच.डी. प्रशिक्षणाच्या काळात त्याला डिन्स डॉक्टोरल फेलोशिप व एसआयइएम फेलोशिप मिळाली. २००६मध्ये विद्यापीठाकडून सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक हा पुरस्कार मिळाला. अभ्यासातील उत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारी ‘ब्लॅक बेरी शिष्यवृत्ती’ही त्याला २०११-१२ या वर्षांकरिता मिळाली.
निरंजनचा पीएच. डी. संशोधनाचा विषय देशातील कोटय़वधी मधुमेहींना दिलासा देणारा ठरला. मधुमेह आजार शोधण्याचे प्रमुख साधन म्हणजे रक्तपेशीतील ग्लुकोजची तपासणी करणे आणि ती मर्यादित ठेवणे. नवीन शोधांमुळे डोळ्यातील पाण्यासारखी इतर जैविकद्रव्ये यांची तपासणी करून ग्लुकोजची पातळी ओळखता येते. ग्लुकोजमध्ये विद्युतप्रवाह असतो. नवीन ‘मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टीम’ या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे अनेक जैविक सेन्सरचा शोध लागलेला आहे, हे सेन्सर बाह्य़ स्पर्शाने किंवा कमीत कमी टोचून रक्त अथवा डोळ्यातील पाण्यातील ग्लुकोजचे प्रमाण ओळखतात. सध्या अस्तिवात असलेल्या सíकट डिझाइनमध्ये दोन वेगवेगळे सíकटस असतात. एका सíकटमुळे रिअ‍ॅक्शन पोटेंशियल कंट्रोल करता येते, तर दुसरे सíकट रिअ‍ॅक्शन विद्युत प्रवाहाची नोंद करते. यासाठी साहजिकच दोन वेगळ्या सíकटसमुळे जास्त ऊर्जा वापरली जाते. या विद्युतप्रवाहात अवाजवी घटक पण असतात. यामुळे येणारे निदान तेवढे अचूक नसतात. निरंजनने आपल्या संशोधनातून एकाच डिझाइनमध्ये दोन नवीन सर्किट तयार  केली आहेत. त्याला ‘वाइड डायनामिक रेंज आर्किटेक्चर’ म्हणतात. पहिले सर्किट रक्तातील ग्लुकोज तपासते आणि दुसरे सíकट रक्त अथवा डोळ्यातील पाण्यातील ग्लुकोजचे प्रमाण तपासते. हे नवीन जैविक सेन्सरला हाताळायला सोपे आणि सोयीचे आहे आणि त्याचबरोबर अवाजवी घटकाचा अडथळा दूर करते. त्यामुळे ही पद्धत निदान अचूक करण्यास मदत करते. या संशोधनाचे पुढचे पाऊल म्हणजे भविष्यात डोळ्यातील लेन्समध्ये हे सेंसर लावता येतील. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कमी-जास्त झाल्याचे लगेच लक्षात येईल. सध्या निरंजन कॉलिफरेनियातील इंटेल येथे बिनतारी तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत आहे. त्यासाठी सर्वोत्तम संशोधनाचा पुरस्कारही त्याला मिळाला आहे.
सुरेंद्र दिघे
कार्यकारी विश्वस्त-जिज्ञासा ट्रस्ट, ठाणे.
surendradighe@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 12:38 pm

Web Title: achievements of young scientists niranjan karandikar
Next Stories
1 पधारो म्हारे देस.!
2 जानेवारीचे आकाश
3 झाडांचे नियोजन
Just Now!
X