News Flash

अ‍ॅसिड हल्ल्यात पत्रकाराचे कुटुंब होरपळले

गुटख्याच्या विरोधात वृत्त प्रसिद्ध केल्याने पूर्णा येथील पत्रकार दिनेश चौधरी, त्यांची पत्नी व मुलीवर गुटखामाफियाने अ‍ॅसिड हल्ला केला. पूर्णा शहरात मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही

| March 14, 2013 02:49 am

गुटख्याच्या विरोधात वृत्त प्रसिद्ध केल्याने पूर्णा येथील पत्रकार दिनेश चौधरी, त्यांची पत्नी व मुलीवर गुटखामाफियाने अ‍ॅसिड हल्ला केला. पूर्णा शहरात मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणात गुटखाकिंग तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद अली सय्यद हसन याच्यासह पाचजणांवर गुन्हा नोंदविला. यातील चौघांना अटक करण्यात आली. मात्र, मुख्य आरोपी सय्यद अली फरारी आहे.
पत्रकार चौधरी व त्यांच्या कुटुंबीयांस नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आरोपींना तत्काळ अटक केली जाईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार तथा सर्वपक्षीय शिष्टमंडळास दिले. सय्यद हबीब सय्यद हसन (वय ३५), मुंजा विश्वनाथ दरगू (वय ४०), अनिल बंडुप्पा कुरकुले (वय ३२) व पंडित वालकर (वय ३०) या चार आरोपींना पोलिसांनी बुधवारी दुपारी अटक केली. मुख्य आरोपी सय्यद अली सय्यद हसन फरारी आहे. त्याला शोधण्यासाठी चार वेगवेगळी पथके रवाना केली असून, राजकीय पाश्र्वभूमी असली तरी त्याला अटक करण्यात येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी शहरात सुरू असलेल्या गुटखाविक्रीचे वृत्त नुकतेच एका वृत्तपत्रात दिले. त्यामुळे गुटखाकिंग सय्यद अलीचे पित्त खवळले. चौधरी यांना शहरातील काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद अली, रवींद्र दरगू, अनिल कुरकुले व हमीद या चौघांनी यापूर्वी धमकावले होते. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दरगू हा दारू पिऊन चौधरी यांना बोलावण्यास आला होता. या वेळीही त्याने चौधरींना धमकावले व घराचा दरवाजा तोडून चौधरी यांच्या अंगावर अ‍ॅसिड टाकले. अ‍ॅसिड हल्ल्यात चौधरी, त्यांची पत्नी अरुणा दिनेश चौधरी व मुलगी रश्मी या दोघी गंभीर जखमी झाल्या. त्यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणी परभणी जिल्ह्य़ासह संपूर्ण राज्यभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. या आरोपींविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. दरगू, कुरकुले या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्य आरोपी सय्यद अली सय्यद हसन पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच रात्रीच अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयवंत तांबारे पूर्णा शहरात पोहोचले. सकाळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी भेट दिली. या वेळी पत्रकार तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्यांना भेटले. सय्यद अली विरोधात गुटखा विक्रीचे वृत्त दिल्यामुळेच हा अ‍ॅसिड हल्ला झाला. त्यामुळे या गुन्ह्य़ातील आरोपींना तत्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी लावून धरली.
अधीक्षकांना भेटलेल्या शिष्टमंडळात पालिकेचे उपाध्यक्ष विशाल कदम, नगरसेवक साहेब कदम, रुपेश सोनटक्के, रा. काँ.चे शहरप्रमुख बंटी कदम, मनसेचे प्रशांत कापसे, मुन्ना राठोड यांचा समावेश होता.
पत्रकारांकडून निषेध
या घटनेचा सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सर्व आरोपींना तत्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी पत्रकारांच्या वतीने करण्यात आली.
दरम्यान, राज्यमंत्री फौजिया खान यांनीही या घटनेचा निषेध केला. ही घटना निंदनीय असून आरोपीला तत्काळ अटक करण्याचे आदेश त्यांनी पोलीस अधीक्षक पाटील यांना दिले. चौधरी यांच्या कुटुंबीयांची खान यांनी चौकशी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 2:49 am

Web Title: acid attack on journalist family
Next Stories
1 वाळूचोरी करणारे ५ ट्रॅक्टर जप्त, लाखाचा दंड वसूल
2 अजित पवारांच्या आश्वासनानंतर पाणीप्रश्नावरील आंदोलन स्थगित
3 वन्य प्राण्यांना पाणी देण्यासाठी यंत्रणेची कसरत
Just Now!
X