टी. एन. शेषन, गो. रा. खैरनार, टी. चंद्रशेखर.. ही नामावली खूप मोठी होऊ शकते. या साऱ्यांना जोडणारा एक समान धागा आहे. या साऱ्यांनी ‘सिस्टिम’ परिणामकारकपणे आणि कार्यक्षमतेने वापरली. त्याचा सामान्य जनतेला मोठा लाभ झाल्याने तिचा भरघोस पाठिंबा या साऱ्यांना मिळाला. गेले काही महिने विविध कारणाने चर्चेत राहिलेले सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे हे या यादीतील ताजे नाव. कायदेशीरपणे कारवाई केल्यानंतरही काही उच्चभ्रूंच्या टीकेमुळे त्यांना ‘वादग्रस्त’ करण्यात आले. प्रत्यक्षात ते ज्या परिसरात जातात तेथे सगळेकाही ‘नियमानुसार’ होते. ‘असाच माणूस’ सर्वत्र पाहिजे, ही सर्वसामान्यांची त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. पालिका, पोलीस, राज्य आणि केंद्र सरकारचे अधिकारी या घटनेतून काही बोध घेतील का?
वेळेत बार बंद. अगदी पानवाल्यांपासून फेरीवाल्यांपर्यंत सारेच रात्री साडेदहानंतर आपली ‘पथारी’ गुमान उचलू लागले आहेत. स्थानिक पोलिसांनीही ‘हप्ता नको’ अशी भूमिका घेतली आहे. मुंबईत धडाकेबाज कारवाईने अनेकांची झोप उडविणाऱ्या ‘ढोबळे’गिरीचा हा परिणाम आहे. सहायक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी समाजसेवा शाखेत असताना डान्स बार, वेश्या अड्डे, बाल कामगार ते उच्चभ्रूंचे पब, नाईट क्लब, डिस्को थेकवाल्यांमध्ये आपल्या कारवाईने दहशत पसरविली होती. त्यांच्याविरोधात कोल्हेकुई करणाऱ्या या उच्चभ्रूंनी ‘ढोबळेगिरी नही चलेगी’, असे फलकही लागले. त्यामुळे ढोबळेंना पाठिंबा देणाऱ्या माजी आयुक्त अरूप पटनाईक यांच्या उचलबांगडीनंतर नवे आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी ढोबळेंची समाजसेवा शाखेतून बदली केली आणि त्याना पाठविले वाकोला विभागात. वाकोला आणि विलेपार्ले पोलीस ठाण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या ढोबळेंनी तेथेही आपली खास पद्धत सुरू केली आहे. या ढोबळेगिरीचा धसका घेऊनच संपूर्ण परिसराला शिस्त येऊ लागल्याने स्थानिक नागरिकही आनंदित झाले आहेत. वाकोला विभागात बदली झाल्यादिवसापासून ढोबळे यांनी सर्व बार, अनधिकृत धंदे करणारे, फेरीवाले, रात्री उशिरापर्यंत नियमबाह्य़ व्यावसाय करणाऱ्यांना चांगलाच चाप लावला. मुंबईत बहुतेक सर्व ठिकाणी बार अथवा हॉटेल मालक हॉटेलसमोरील मोकळी जागा बिनदिक्कत आणि बेकायदा वापरतात. यासाठी पोलीस व पालिका अधिकाऱ्यांना हप्ते दिले जातात, हे उघड गुपित आहे. ढोबळे यांनी सर्वप्रथम बार तसेच हॉटेलसमोरील मोकळ्या जागांचा वापर करण्यास बंदी घातली. वाकोल्यामधील सर्व बारमध्ये बंदी असतानाही बिनधास्तपणे धूम्रपान करता येत होते. ढोबळे आल्यापासून ते बंद झाले आहे. नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ व्यवसाय सुरू ठेवण्याची हिम्मत एकाही बार अथवा हॉटेलमालकाची होत नसल्याचा अनुभव येत आहे. एकही पानवाला रात्री अकरानंतर आपली टपरी उघडी ठेवत नाही. एवढेच नव्हे तर फेरीवाल्यांनाही शिस्त लागल्याचे दिसून येत आहे.
* बेशिस्त वाकोला..
ढोबळे यांची या विभागात बदली होण्याआधी विलेपार्ले तसेच वाकोला पोलीस ठाण्यात फेरीवाले, अनधिकृत धंदेवाले तसेच डान्सबारमालकांची कमालीची दादागिरी होती. एअर इंडिया वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुकानदारही मनमर्जी  वागत होते. परंतु ढोबळे यांची आपल्या विभागात बदली झाल्याची कुणकुण त्यांना लागली. त्यानंतर लगेचच त्यांच्या वागण्यात फरक पडला होता. ढोबळे यांनी एकदा येऊन दम भरल्यानंतर सारेच धास्तावल्याचे दिसून येत आहे. ढोबळेंच्या ‘हॉकी स्टिक’चा प्रसाद कोण खाणार, असा सवाल सर्वचजण करीत आहेत.
* ढोबळेगिरी अन्यत्र का नाही?
अवघ्या एक महिन्यात वाकोला हद्दीत ढोबळे यांनी जे करून दाखवले ते संपूर्ण मुंबईत अन्य सहायक आयुक्तांकडून का केले जात  नाही, असा सवाल आता लोकांकडूनच विचारला जात आहे. एका पाणीपुरीवाल्याने सांगितलेला किस्सा अजब आहे. तो म्हणाला, पूर्वी पोलीसवाले हफ्ता आणि पाणीपुरी दोन्ही फुकट खायचे. आता हफ्ताही घेत नाहीत आणि फुकटची पाणीपुरीही खात नाहीत. वाकोला आणि विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस सध्या कमालीचे विनम्र झालेले दिसतात. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणाऱ्या लोकांशीच नव्हे तर बंदोबस्ताच्या वेळीही सर्वाशी विनम्रपणे वागताना दिसतात. एका बार मालकाच्या म्हणण्यानुसार ‘ढोबळेसाब सात महिनोमें रिटायर होनेवाले है, तबतक सब कानून से चलेगा, बाद मे फिरसे सब शुरू हो जायेगा’. बारमालकाच्या या उद्गारातच मुंबई पोलीस अधिकाऱ्यांची मानसिकता दिसून येते. या साऱ्याबाबत वसंत ढोबळे यांना अनेकदा दूरध्वनी करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ‘मी केवळ माझे काम करतो’ एवढे बोलून अधिक कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही.
* ढोबळे वेगळे काय करतात?
ढोबळे हे इतर सहायक आयुक्तांप्रमाणे फक्त केबीनमध्ये बसत नाहीत. उलटपक्षी ते आपल्या परिसरात सतत फिरत असतात. एखादा गैरप्रकार दिसला की लगेचच कारवाई करतात. या कारवाईत काहीही दया-माया नसते. कुठलीही कारवाई बेकायदा नसते. मुंबई पोलीस कायदा आणि भारतीय दंड संविधानातील कलमाचाच ते योग्य वापर करतात तर इतर पोलीस अधिकारी या कलमांची भीती दाखवून हप्ते उकळतात.