प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व जालना जिल्हा प्रभारीपदाची धुरा सोपविण्यात आलेल्या अरुण मुगदिया यांना जालना दौऱ्यात पक्षांतर्गत दुफळीचे दर्शन घडले. जिल्हा काँग्रेस बैठकीसह विरोधातील बैठकीलाही त्यांनी हजेरी लावली. जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, आमदार कैलास गोरंटय़ाल यांच्या उपस्थितीत पहिली बैठक झाली, तर आर. आर. खडके यांच्या निवासस्थानी दुसरी बैठक झाली.
जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत पक्षाची वचनपूर्ती यात्रा यशस्वी करण्याचा मुख्य विषय होता, तर ‘निष्ठावंतां’च्या दुसऱ्या बैठकीत डोंगरे यांना पदावरून हटविण्याच्या मागणीवर खल झाला! ‘जिल्हय़ात काँग्रेस केवळ नावाला शिल्लक असून पक्षाची स्थिती सुधारण्यास ठोस पाऊस उचलण्याची गरज आहे’, असे मत दुसऱ्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. डोंगरे यांना पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी ही मंडळी दिल्लीवारी करूनही आली आहे.
डोंगरे यांच्यामुळे जिल्हय़ात पक्षाची हानी होत असल्याचा आरोप करणाऱ्यांचा हेतू त्यांना जालना मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मिळू नये, हा होता. डोंगरे यांच्यामागे पक्षाचे एकमेव आमदार कैलास गोरंटय़ाल यांचे बळ आहे. डोंगरेविरोधी गटाने ‘निष्ठावंत काँग्रेस’ या नावाने प्रसिद्धिपत्रक काढले. वास्तविक, निष्ठावंतांच्या बैठकीस पक्षादेश झुगारून निवडणुका लढविणारे व अन्य पक्षांत जाऊन परत आलेलेही पुढारी होते. ‘निष्ठावंतां’च्या बैठकीत आमदार सुभाष झांबड यांचा सत्कार झाला त्यांनीही या आधी विधिमंडळ सदस्यत्वाच्या दोन निवडणुका काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध लढविल्या आहेत, हे विशेष!
डोंगरे समर्थकांच्या मते ते जिल्हाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसची स्थिती पूर्वीच्या तुलनेत सुधारली. ते जिल्हाध्यक्ष होण्यापूर्वी जिल्हय़ात पक्षाचा एकही आमदार वा नगराध्यक्ष नव्हता. आता एक आमदार व नगराध्यक्ष आहे. पूर्वीच्या तुलनेत नगरपालिकेतील व पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढली आहे. जिल्हा परिषद सदस्य वाढले नसले तरी पूर्वीएवढे कायम आहेत. डोंगरे समर्थकांनी त्यांची बाजू जिल्हा प्रभारी मुगदिया यांच्याकडे मांडली. लोकसभेच्या जालना मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेसला भाजपकडून सलग पाच वेळा पराभव पत्कराला लागला.
दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत जालना मतदारसंघ काँग्रेसकडेच राहिल्यास उमेदवार ठरविताना कैलास गोरंटय़ाल, डॉ. कल्याण काळे व अब्दुल सत्तार या तीन आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या पाश्र्वभूमीवर डोंगरे यांच्या संभाव्य उमेदवारीस विरोध करण्यास जिल्हय़ात पक्षीय पातळीवर आतापासूनच सुरुवात झाली आहे. डोंगरे यांची मजल जि. प. सभापतिपदाच्या पुढे गेली नाही. अलीकडच्या काही दिवसांतील अपवाद वगळता जिल्हय़ातील काँग्रेसमध्ये त्यांच्याविरुद्ध जाहीर आवाज उठला नाही. डोंगरे यांना अध्यक्षपदावरून हटविल्यास त्यांच्या जागी कोणाची वर्णी लावायची याचे उत्तर त्यांचे विरोधकही स्पष्ट देत नाहीत. संपूर्ण जिल्हाभर अस्तित्व असलेल्या अन्य प्रमुख तीन पक्षांसारखे नेतृत्व काँग्रेसकडे नाही. परंतु परंपरांगत मतपेढी मात्र पक्षाकडे आहे. अलीकडच्या काळात कार्यकर्ते कमी व नेते अधिक, असे चित्र काँग्रेसमध्ये निर्माण झाले आहे. असे अनेक नेते काँग्रेसमध्ये आहेत की ज्यांना स्वत:च्या गावची ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकता येत नाही की नगरपालिकेच्या एखाद्या प्रभागातही निवडून येता येत नाही. परंतु गटबाजीच्या प्रदर्शनात मात्र कोणी मागे हटायला तयार नाही.
गेल्या लोकसभेत काँग्रेस पक्ष प्रतिस्पर्धी भाजपची साडेचार हजार मते कमी करू शकला असता, तर खासदार याच पक्षाचा झाला असता. परंतु लोकसभा निवडणूक आली की पक्षातील गटबाजीला उधाण येण्याचा इतिहास मागील २५-३० वर्षांपासून कायम आहे. काँग्रेसमधील या उखाळय़ा-पाखाळय़ा भाजपच्या पथ्यावर पडल्या आहेत. लोकसभेची जागा काँग्रेसकडे आणायची तर भाजपच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल. परंतु भाजपविरुद्ध लढायचे कसे हा विचार करण्याऐवजी बैठका घेऊन पक्षातील राजकारणाबद्दल गळे काढून रडायचे उद्योग कशासाठी, हाच जिल्हय़ाचे प्रभारी मुगदिया यांच्यापुढील प्रश्न असेल.