‘विनातिकीट प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे’, ‘रूळ ओलांडणे धोक्याचे ठरू शकते’, ‘ओव्हरहेड वायर २५ हजार वोल्ट प्रवाही आहे. त्यामुळे छतावरून प्रवास करू नका’, या आणि अशा अनेक उद्घोषणा दर दिवशी मुंबईकर प्रवासी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतात. रेल्वे सुरक्षा दलाने गेल्या आठवडय़ात केलेल्या धडक कारवाईत अवघ्या ६ दिवसांत रेल्वे कायद्यातील कलमांचा भंग करणाऱ्या २२६२ लोकांना पकडले. त्यांच्याकडून तब्बल चार लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असला, तरीही ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ ही म्हण काही रेल्वे प्रवाशांना लागू होत नाही.
रेल्वेमार्गावरील अपघात टाळण्यासाठी वेळोवेळी रेल्वेकडून प्रवाशांना सूचना देण्यात येतात. यातील अनेक गोष्टींचा अंतर्भाव ‘रेल्वे कायद्या’तही केला गेला आहे. मात्र मध्य व पश्चिम रेल्वेवरील प्रवासी सर्रास हे सर्व कायदे मोडतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने १८ ते २३ नोव्हेंबरदरम्यान धडक मोहीम हाती घेत अनेकांवर कारवाई केली. यात विनातिकीट प्रवास करणारे, रूळ ओलांडणारे, गाडीच्या टपावरून प्रवास करणारे, तिकिटांची दलाली करणारे, अनधिकृत फेरीवाले, महिलांच्या डब्यातून प्रवास करणारे, आरक्षित डब्यांमधून विनातिकीट वा विना परवाना प्रवास करणारे अशा अनेकांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने पश्चिम रेल्वेवरील काही स्थानकांवर छापा मारून बेकायदा तिकीटविक्री करणाऱ्या दलालांना पकडले होते. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने गेल्या आठवडय़ात या मोहिमेत ३ दलालांना पकडले. टपावरून प्रवास करणाऱ्या ६४ जणांना गेल्या सहा दिवसांत अटक करण्यात आली. तर महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या ८८ पुरुषांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली. रेल्वे सुरक्षा दल अशा प्रकारच्या मोहिमा नेहमीच राबवत असते. रेल्वेची सुरक्षा हे आमचे कामच आहे. मात्र प्रवाशांनीही रेल्वे कायद्याचा भंग करण्याच्या घटना टाळायला हव्यात. रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केल्यावर फक्त दंड किंवा काही दिवस अटक एवढीच शिक्षा होते. मात्र एखादी दुर्घटना घडल्यास त्यामुळे कायमस्वरूपी अपंगत्त्व येऊ शकते किंवा ती दुर्घटना जीवावरही बेतू शकते. या सर्वाचा विचार प्रवाशांनीही करायला हवा, असे रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय संचालक आलोक बोहरा यांनी सांगितले.
१८ ते २३ नोव्हेंबरदरम्यान करण्यात आलेली कारवाई
कायदे कलम              घटना          दंड
विनातिकीट प्रवास          ५९          २८,१७५
साखळी खेचणे              १५        ४,२००
तिकीट दलाली               ०३       २५,०००
अनधिकृत फेरीवाले         ८८१      १,५२,०८०
रेल्वे परिसरात गोंधळ        २५        २९००
रूळ ओलांडणे              १९४       २१,५००
आरक्षित डब्यात घुसणे      ९०३      ९०,८००
टपावरून प्रवास               ६४        ७,३००
अनधिकृत पार्किंग             १०        १,०००
महिला डब्यातून प्रवास       ८८         ७,४५०
अनधिकृत जाहिरातबाजी     १८        ४९००