नगराध्यक्षा करुणा पाटील यांचे आदेश
मद्यधुंद अवस्थेत जे कर्मचारी कामावर येतील त्यांची तत्काळ वैद्यकीय तपासणी करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश येथील नगराध्यक्षा करुणा पाटील यांनी कार्यालय पर्यवेक्षकांना दिले. नवनिर्वाचित करुणा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
मुख्याधिकारी डॉ. पंकज पवार, उपाध्यक्ष मुख्तार शेख अहमद आदी या वेळी उपस्थित होते. स्वच्छतेच्या कामाविषयी नाराजी व्यक्त करत प्रशासनाने यावर लक्ष केंद्रित करावे, असे मत त्यांनी मांडले. स्वच्छता निरीक्षकांनी याची दखल घेत संबंधितांवर कठोर कारवाई करत तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांना आपल्या तक्रारी किंवा समस्येसंदर्भात संपर्क साधता यावा यासाठी सर्व विभाग प्रमुखांचे भ्रमणध्वनी क्रमांक व पद, कामासह यादी सर्व नगर परिषद सदस्यांना देण्याचे तसेच कार्यालयात लावण्याचे ठरविण्यात आले. परिषदेत कचरा संकलन वाहनांना घंटा बसविणे, शहरात कीटकनाशकाची फवारणी करण्यासंदर्भात संबंधित ठेकेदारास सूचना देण्याचे ठरले. बांधकाम विभागाच्या कामाचा आढावा या वेळी घेण्यात आला. टॅक्सी स्टॅण्ड हलविण्याविषयी सूचना देण्यात आल्या. लोंबकळत्या विद्युत तारा, नादुरुस्त विद्युत खांब यांविषयी संबंधित विभागास सूचना देऊन यासंदर्भातील अहवाल पुढील बैठकीत मागविण्यात आला आहे. एक खिडकी योजना सुरू करणे, संगणक प्रशिक्षण घेतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे अद्ययावत प्रशिक्षण देणे आणि कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचा ठराव सभेत करण्यात आला. पाणी बचतीसाठी ज्या नळांना तोटय़ा नाहीत असे नळ सील ठोकणे, नोटीस देणे व त्याप्रमाणे वसुली विभागास माहिती देऊन पाणीपट्टीत रक्कम दंड म्हणून जादा आकारणी करावी, अशा सूचना करण्यात आल्या. परिषदेने थकीत वसुली लवकरात लवकर वसूल करावी, त्वरित मूल्यनिर्धारणाचे काम हाती घेऊन नवीन घरांची पाहणी केल्यास नगर परिषदेला जादा उत्पन्न मिळू शकेल, अशी सूचना राकेश पाटील यांनी केली. त्रिसदस्य समितीकडून उर्वरित गाळ्यांचे भाडे ठरवून जाहीर लिलाव करण्याचे सर्वानुमते ठरले.