तुम्हाला नागपूर शहरात फिरायचे आहे? वाहन शहराबाहेर ठेवून पायी या.. भाजी बाजारात जायचे असेल, तर उडय़ा मारण्याचे प्रशिक्षण घ्या.. असे म्हणायची आता वेळ आली आहे. कारण, बेशिस्त वाहतूक आणि अतिक्रमणांमुळे नागपूर शहरात फिरता येण्याजोगी स्थिती राहिलेली नाही. यात सुधारणा होण्याची शक्यता नाही. अधूनमधून थोडीफार शिस्त आणण्याचा प्रयत्न होतो, परंतु ती कारवाई थातूरमातूर असते. वाहतूक पोलीस, आरटीओ मारल्यासारखे करतात आणि वाहनचालक, रिक्षाचालक रडल्यासारखे करतात. डायऱ्या भरतात, दंड होतो. पुन्हा बेकायदा वाहतूक करण्यास मोकळे!
जनतेने जर ठरवले, तर हा प्रश्न सुटेल. मात्र, त्यासाठी स्वयंशिस्तीचा धडा गिरवायला हवा. म्हणजे पोलीस आणि संबंधित यंत्रणेशी तुम्हाला भांडता येईल. नागपूर शहर सर्व दिशांनी वाढू लागले आहे. बाजारपेठाही आडव्या-तिडव्या पसरत आहेत. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढते आहे. बेशिस्त वाहनांना आवर घालण्यास वाहतूक पोलीस कमी पडत आहेत. इतवारी, सीताबर्डी, रेल्वे स्थानक, बसस्थानक परिसरात कमालीची बेशिस्त वाहतूक सुरू असते. त्यात प्रामुख्याने ऑटो, स्टार बसेस, सायकल रिक्षांचा समावेश आहे. नागपूरचे रिक्षावाले ‘कट’ मारण्यासाठी बदनाम आहेत. ते कधी कुठे सुळकी मारतील याचा भरवसा नाही. रिक्षात प्रवाशांना कोंबून (तर काही मोठय़ा आवाजात टेपवर गाणे लावून) रिक्षावाले पळत असतात. प्रवाशांना दमबाजी, लुटण्याचा प्रकारही होतो. वाहतूक पोलीस हे मख्खपणे पाहत असतात, असे लोक सांगतात.
बसस्थानक परिसरात ऑटो आणि सायकल रिक्षा आडव्या-तिडव्या लावलेल्या असतात. बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचाही सुळसुळाट तेथे वाढला आहे. बाजार समितीमध्ये शेतीमाल घेऊन येणाऱ्या ट्रक्समुळे रेल्वे आणि बसस्थानक रस्त्यावर नेहमीच कोंडी झालेली असते. या वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी सुटणार हे कोणालाच माहीत नाही.
बेशिस्त वाहतुकीबरोबरच मुख्य रस्त्याने कंटनेर, क्रेन यासारखी अवजड वाहने दिवस-रात्र पळत असतात. या वाहनांमुळे कितीतरी अपघात झाले आहेत. शहराच्या अनेक चौकात अजूनही सिग्नल नाहीत. ते तातडीने बसवण्याची गरज आहे. बहुतांश ठिकाणी दुकानदारांनी रस्त्यावर लावलेले सामान, हातगाडय़ा, फळविक्रेते यांचा गराडा असतो. अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केल्यास वाहतूक व्यवस्था सुधारेल. महापालिका, जिल्हाधिकारी, पोलीस, आरटीओ यांनी एकत्रितपणे कठोर कारवाई केल्यास शहरातील वाहतूक सुखावह होईल, यात शंका नाही.