शहरातील १२ व्यापाऱ्यांनी जास्त माल आणून तो कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला. मात्र, त्याची कुठेच नोंद न केल्यामुळे महापालिकेच्या एलबीटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून त्यांच्याकडून जास्तीचा माल आणलेल्याची कागदपत्रे आणि देयके जप्त केली. ही कारवाई करताना स्थानिक मंत्र्याकडून दबाव आणला गेल्याची माहिती समोर आली. मात्र, स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी कुठलाही दबाव आला नसल्याचे सांगितले.
स्थानिक संस्था करामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. शहरातील २० हजार व्यापाऱ्यांनी अजूनपर्यंत एलबीटीची नोंद केली नाही. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. मात्र, शासनाकडून महापालिका प्रशासनावर दबाव आल्यामुळे कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. दोन दिवसांपूर्वी पूर्व नागपुरातील ५ व्यापाऱ्यांच्या कोल्ड स्टोरेजवर एलबीटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुणाल, विदर्भ, परमेश्वरी, प्रकाश वाधवानी, गोयल, हरिओम, सुरेश एक्सपोर्ट या कंपनीवर कारवाई करून त्यांच्याकडील दस्ताऐवज जप्त केले. गोयल कंपनीने महत्त्वाची कागदपत्र देण्यास विरोध केला. गोयलकडे कारवाई सुरू असताना त्या भागातील व्यापारी संघटित झाले आणि त्यांनी विरोध केला. त्यामुळे कारवाई अपूर्ण राहिली. दरम्यान, ही कारवाई सुरू असताना स्थानिक मंत्र्यांचा अधिकाऱ्यांना दूरध्वनी आल्यामुळे पुढील कारवाई थांबविण्यात आल्याची माहिती मिळाली. मात्र, बोरकर यांनी असा कुठल्याही मंत्र्याचा दूरध्वनीवरून कारवाई थांबली नसल्याचे सांगितले. सर्व व्यापाऱ्यांकडील दस्ताऐवज तपासल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.