ठाणे शहरात अनधिकृतपणे भरणाऱ्या आठवडा बाजारवर बंदी घालण्याचे आदेश असतानाही शहरातील रस्ते आणि पदपथ अडवून अशा प्रकारचा बाजार बिनदिक्तपणे सुरू आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडू लागली आहे. तसेच या बाजारामुळे गुंडगिरी वाढू लागली असून पाकीटमार, लुटीची प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे शहरातील आठवडा बाजारावर पुन्हा बंदी घालण्याचा निर्णय शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये घेण्यात आला. तसेच अशा प्रकारचे बाजार शहरात भरू नयेत, यासाठी महापालिकेच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागात रस्ते व पदपथ अडवून आठवडा बाजार भरतो. किसननगर, लोकमान्यनगर, मानपाडा, या भागात अशा प्रकारचा मोठा बाजार भरतो. या बाजारमध्ये कपडे, खेळणी तसेच अन्य साहित्यांची विक्री करण्यासाठी सुमारे १५०० विक्रेते येतात. त्यामध्ये मुंबई तसेच आसपासच्या शहरातील विक्रेत्यांचे प्रमाण जास्त असते. परिसरातील गुंडापुंडाच्या आशीर्वादाने अशा प्रकारचे बाजार भरविण्यात येत असून त्यामध्ये पाकीटमार, लुटमारीचे प्रकार घडत आहेत. तसेच या बाजारामुळे शहरातील वाहतूक व्यस्थेचे तीनतेरा वाजत असल्याचे चित्र शहरात आहे. शहरात अशा प्रकारचे बाजार भरू नयेत, असा निर्णय यापूर्वीच सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. मात्र, असे असतानाही शहरात अशा प्रकारचे बाजार भरविले जातात आणि त्या बाजारावर महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत नाही.
याच मुद्दय़ावरून शुक्रवारी स्थायी समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्यांनी महापालिका प्रशासनाला जाब विचारला. त्यावेळी महापालिका प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही.
त्यामुळे सर्वपक्षीय सदस्य चांगलेच आक्रमक झाले. अखेर या बाजारावर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
चायनीज गाडय़ा मद्याचे अड्डे
घोडबंदर येथील सेवा रस्ते अडवून चायनीज गाडय़ा थाटण्यात आल्या आहेत. या गाडय़ांवर उघडय़ावर मद्यप्राशन करण्याचे काम सुरू असते. त्यामुळे याचकरिता सेवा रस्त्यांसाठी आम्ही जागा दिली का, असा सवाल सेवा रस्त्यातील बाधितांकडून करण्यात येत आहे. मानपाडा येथील शिवाजीनगर भागातील आरोग्य केंद्राजवळ चायनीजची गाडी असून त्या ठिकाणी मद्यप्राशन केल्यानंतर रिकाम्या बाटल्या आरोग्य केंद्रात फेकण्यात येतात, असा आरोप शिवसेनेच्या सदस्य मीनाक्षी शिंदे यांनी केला. तसेच चायनीज गाडय़ांमुळे शहरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते, असा मुद्दा सदस्यांनी मांडला. त्यावर या गाडय़ांवर कारवाई करण्यासाठी आरोग्य आणि अतिक्रमण विभागाची सयुक्त मोहीम राबविण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.