डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़मंदिर चौक ते टाटा पॉवर हाऊस दरम्यान बेकायदेशीरपणे उभी राहिलेली ‘मार्बल नगरी’ पाडण्यासाठी महापालिकेच्या ‘फ’ प्रभागाने तयारी सुरू केली आहे. येथील टाटा हाऊसलगत असलेली तीन दुकाने महापालिकेच्या पथकाने पाडली. पोलीस बंदोबस्त नसल्याने तसेच व्यावसायिक आणि गावगुंडांनी विरोध केल्यामुळे ही कारवाई अर्धवट सोडून महापालिकेच्या पथकाला माघारी फिरावे लागले.
टिळकनगर पोलिसांनी सणासुदीचे कारण पुढे करून बंदोबस्त देण्यास नकार दिल्याने ही कारवाई तात्पुरती थांबविण्यात आली आहे, असे ‘फ’ प्रभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. महापालिका हद्दीत ‘फ’ प्रभागाच्या अंतर्गत सावित्रीबाई फुले नाटय़मंदिर चौक ते टाटा पॉवर हाऊस (पिसवली) दरम्यान ७४ बेकायदा दुकाने उभी राहिली आहेत. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ही बांधकामे फोफावत गेली असून त्या विरोधात लोकप्रतिनिधी ‘ब्र’ उच्चारण्यासही तयार नाहीत. या अनधिकृत मार्बल नगरीवर महापालिकेकडून गेल्या १५ वर्षांत कधीच कारवाई झाली नाही. ‘लोकसत्ता’ने गेल्या वर्षी हा प्रकार उघडकीस आणला. तेव्हापासून अतिक्रमण विरोधी पथकाने या बेकायदा दुकानांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू  केली. ‘ह’ प्रभागाचे अधिकारी विनायक पांडे, संजय कुमावत यांच्या पथकाने ही सर्व मार्बल नगरी तोडण्यासाठी योजना तयार केली आहे. दरम्यान, मंगळवारी पालिकेचे पथक मार्बल नगरी तोडण्यासाठी गेले होते. त्यांनी तीन दुकाने तोडली. मात्र पोलीस बंदोबस्त नसल्याने पथकाला विरोध झाला. त्यामुळे ते परत आले. नवरात्रोत्सव, ईदचा सण असल्याने पोलीस बंदोबस्त देणे शक्य नाही. हे सण संपल्यानंतर बंदोबस्ताची तजवीज केली जाईल, असे पत्र टिळकनगर पोलिसांनी पालिकेच्या ‘फ’ प्रभाग अधिकाऱ्यांना पाठविले आहे. त्यामुळे बंदोबस्ताच्या नावाखाली पोलीसही अनधिकृत बांधकामांना कसे पाठीशी घालतात हे यानिमित्ताने पुढे आले आहे.