News Flash

नाशिक-सिन्नर महामार्गावरील अतिक्रमण उद्ध्वस्त; विस्तारीकरणाचे काम सुरू

नाशिक-सिन्नर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी संपादीत केलेल्या जागेवरील दुतर्फा बांधकामे काढण्यास धडाक्यात सुरूवात झाल्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये अस्वस्थता पसरली

| January 13, 2015 08:48 am

नाशिक-सिन्नर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी संपादीत केलेल्या जागेवरील दुतर्फा बांधकामे काढण्यास धडाक्यात सुरूवात झाल्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या मोहिमेचा धसका घेऊन चेहेडी, पळसे व महामार्गालगतच्या अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. तीन दिवस संपादीत केलेल्या जागेवरील अतिक्रमणे हटविली जाणार आहेत. त्यानंतर लगोलग महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.
मागील काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेने आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविल्याचे अधोरेखीत झाले. परंतु, ही मोहीम महापालिकेऐवजी महामार्ग विभागाने नाशिक-पुणे महामार्गावर नाशिक-सिन्नर या टप्प्यात हाती घेतली आहे. सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, नाशिक-सिन्नर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी संपादीत केलेल्या जमिनीच्या मोजणीचे काम पूर्णत्वास गेले.
काही ठिकाणी भू संपादनाला स्थानिकांचा आक्षेप असून त्याची प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्याचे जिल्हा प्रशासनाने सूचित केले आहे. सिंहस्थात काही महिन्यांचा अवधी राहिल्याने या मार्गाचे विस्तारीकरण कसे पूर्णत्वास जाईल, याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु, सोमवारी या कामाच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात झाली. नाशिक-सिन्नर महामार्गावर दुतर्फा हॉटेल्स, दुकाने अशी विविध स्वरुपाची अतिक्रमणे आहेत.
 विस्तारीकरणासाठी संपादीत केलेल्या जागेवरील अतिक्रमणे हटविणे हे मोठे आव्हान आहे. या पाश्र्वभूमीवर, मोठा पोलीस बंदोबस्त दिमतीला घेऊन महामार्ग विभागाने सकाळपासून सिन्नरफाटा येथून अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. जेसीबीच्या सहाय्याने दुकाने, जुनी घरे पाडण्यास सुरुवात झाली. अनेक घरे व दुकाने भुईसपाट करण्यात आली. यावेळी स्थानिकांकडून फारसा विरोध झाला नाही. दुकाने व घरे जमीनदोस्त होत असल्याचे पाहून अनेकांना गहिवरून आले.
यावेळी महामार्गावर वाहने, बघ्यांची मोठी गर्दी जमली. सर्व प्रकारची अतिक्रमणे तोडली जात असल्याने आसपासच्या अतिक्रमणधारकांनी चांगलाच धसका घेतला. महामार्गावरील चेहेडी, पळसे आदी भागातील हॉटेल्स, दुकाने ही स्वत:हून काढून घेण्यास सुरुवात केली. दिवसभरात महामार्गावरील जवळपास १०० अतिक्रमणे हटविण्यात आल्याचे सांगण्यात आले. ज्या ठिकाणी अतिक्रमण हटवून जागा ताब्यात घेतली जात आहे, तिथे लगेच काम सुरू केले जाणार आहे. बुधवापर्यंत उपरोक्त मार्गातील अतिक्रमणे हटवून जागा ताब्यात घेतली जाईल, असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 8:48 am

Web Title: action on illegal constructions near nashik sinnar highway
टॅग : Loksatta,Nashik,News
Next Stories
1 मोटारविक्रीचे अमिष दाखवून फसवणूक
2 देवळाली छावणी मंडळावर भाजप-रिपाइंचा झेंडा
3 धार्मिक ठिकाणांच्या स्वच्छतेत पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला अपयश
Just Now!
X